प्रेयसीच्या मदतीने स्वत:च्याच मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी भोजपुरी अभिनेता मोहम्मद शाहिद याला अटक करण्यात आली आहे. अडीच महिन्यांपूर्वी त्याने स्वत:च्या मुलाचं अपहरण केलं होतं. मोहम्मदशी त्याच्या पत्नीने घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर कोर्टाने मुलाचा ताबा आईकडे दिला. पण शाहिदला मुलाला आपल्यासोबतच ठेवायचे होते. त्यामुळे मुलाच्या अपहरणाचा बनाव रचल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मद शाहिद आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे.

शाहिदने बऱ्याच भोजपुरी चित्रपटांमधून काम केले आहे. याशिवाय, तो काही भोजपुरी अल्बममध्येही झळकला होता. शाहिदसोबत घटस्फोट झाल्यानंतर मुस्कानने दीड वर्षांपूर्वी दुसरं लग्न केलं. तर शाहिद त्याची प्रेयसी कशिश उर्फ अलिशासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता. कशिशच्याच मदतीनेच शाहिदने मुलाचं अपहरण केलं.

दक्षिण दिल्लीतील बाटला हाऊस येथून मुलाचं अपहरण करण्यात आलं. २६ जून रोजी मुस्कानच्या आईने जामिया नगर पोलीस स्टेशनमध्ये मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मुस्कानची आई तिच्या नातवाला म्हणजेच शाहिद आणि मुस्कानच्या मुलाला शॉपिंगसाठी बाटला हाऊस येथील बाजारात घेऊन गेली होती. मार्केटमधील गर्दीचा फायदा घेत शाहिदने मुलाचं अपहरण केलं. मार्केटमध्ये शाहिदला पाहिल्याचं मुस्कानच्या आईने जबाबात नोंदवलं होतं. पण पोलीस चौकशीत तो सतत चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत होता. दरम्यान, पोलिसांनी दिल्लीतील विनोद नगर परिसरातून मुलाची सुटका केली असून त्याला आईकडे सोपवण्यात आलं आहे.