‘भूमी’ चित्रपटातील सनी लिओनीचं ‘ट्रिप्पी ट्रिप्पी’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. संजय दत्तच्या या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असतानाच यातील दुसरं गाणंही प्रदर्शित झालंय. ‘लग जा गले’ असे बोल असणाऱ्या या दुसऱ्या गाण्यात अभिनेत्री अदिती राव हैदरी सर्वांची मनं जिंकताना दिसतेय.

या गाण्याचं जेव्हा पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं तेव्हा लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘लग जा गले’ या जुन्या गाण्याचं नवीन व्हर्जन असेल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र राहत फतेह अली खान यांच्या आवाजातील हे पूर्णपणे वेगळं गाणं आहे. या गाण्यामुळे बॉलिवूडच्या रोमॅण्टिक गाण्यांच्या यादीत आणखी एकाची भर पडली असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : दत्तक घेतलेल्या मुलीसोबत फोटोसेशन सनीला पडले महागात

प्रिया सरैयाच्या लेखणीतील हे गाणं सचिन- जिगरने संगीतबद्ध केलंय. गाण्याचे बोल आणि सिनेमॅटोग्राफी यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतं. प्रेमाचं प्रतिक मानला जाणाऱ्या ताजमहालजवळ गाण्याची शूटिंग झाली असल्यामुळे गाणं एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातंय. मुख्य म्हणजे यामध्ये अदितीच्या अदाही पाहण्याजोग्या आहेत. अदितीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे गाणं शेअर केलंय.

या चित्रपटात संजय दत्त, अदिती राव हैदरीसोबतच शरद केळकर, सिद्धांत गुप्ता आणि शेखर सुमन यांच्याही भूमिका आहेत. २२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.