बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. याच माध्यमातून ते आयुष्यातील अनेक किस्से अगदी मनमोकळेपणाने मांडत असतात. त्यांच्या या सवयीतूनच त्यांनी नुकतेच ट्विटरच्या माध्यमातून वडिलांच्या शिकवणीला उजाळा दिल्याचे दिसून आले. कोणत्याही कार्यक्रमाला अखेरच्या रांगेत बसण्याला प्राधान्य द्या अशी बाबांनी शिकवण दिली आहे. अमिताभ लिहितात की, बाबा म्हणायचे अखेरच्या रांगेतून तुम्हाला उठवले तर तुम्हाला पुढच्या रांगेतच जागा मिळेल. वडिलांनी दिलेल्या सल्ल्यातून अमिताभ यांनी यशाकडे पाहण्याचा एक आगळा वेगळा विचार सांगितल्याचे दिसते. वडिलांनी दिलेल्या शिकवणीच्या आठवणी सांगताना त्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो देखील शेयर केले आहेत.

अमिताभ यांचे वडिल दिवंगत श्री. हरिवंशराय बच्चन उत्तम कवी होते. यापूर्वी अनेकदा अमिताभ आपल्या वडिलांना कवितांच्या माध्यमातून आठवणी जागृत करताना दिसले आहे. कुटुंबियांविषयी नेहमीच सजक असणारे अमिताभ वडिलांच्या कविता वाचन करताना अनेकदा दिसले आहे. यापूर्वी अमिताभ यांनी वडिलांमुळे समाजात वेगळे स्थान मिळाल्याचे देखील सांगितले होते. एवढेच नव्हे तर वडिल एक प्रसिद्ध आणि सन्मानिय व्यक्ती होते. या नावाशी माझं नाव जोडलं गेल्याने सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक कायदे पाळणे मला गरजेचे होते असे ही ते म्हणाले होते.
अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीमध्ये तब्बल ४८ वर्षाचा प्रवास नुकताच पूर्ण केला. सोशल मीडियावरुनच त्यांनी चित्रपटसृष्टीतील पदार्पणाच्या आठवणींना उजाळा दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनी ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून १५ फेब्रुवारी १९६९ मध्ये अधिकृतरित्या चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला होता.

अमिताभ आज देखील लाखो चाहत्यांमध्ये आपले स्थान टिकवून आहेत. ‘पिंक’ चित्रपटातील अभिनयाच्या जोरावर सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार पटकावून आजच्या घडीला देखील अभिनयाचा बाज कमी झाले नसल्याचेच त्यांनी दाखवून दिले. ‘पिंक’ या चित्रपटात त्यांनी एका दमदार वकिलाची व्यक्तिरेखा साकारली होती.  सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळते. त्यातही अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाविषया चाहत्यांना विशेष आत्मियता आहे ही बाब नाकारता येणार नाही. अभिषेक बच्चनच्या बालपणातील फोटोपासून ते अगदी ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्या पुरस्कार सोहळ्यातील काही खास क्षणांपर्यंतचे सर्वच फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. अशा या बच्चन कुटुंबाला ‘द फर्स्ट फॅमिली ऑफ बॉलिवूड’ म्हणूनही संबोधले जाते. अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्यावरील अमिताभ प्रेमही असेच अनेकदा दिसून आले आहे. यापूर्वी अमिताभ यांनी नातीसाठी लिहिलेली कविता चांगलीच लोकप्रिय झाली होती.