बॉलिवूडचे शहेनशहा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. महत्त्वाचे सण, उत्सव, दिवस यांच्या शुभेच्छा द्यायला ते कधीच विसरत नाहीत. आतही मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा द्यायला ते विसरले नाहीत. त्यांनी ट्विटरवर सर्व मराठी चाहत्यांना हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी ही विश्वामधील एकमात्र भाषा लिपी आहे, जी व्यक्तिला ‘अ’ म्हणजे “अज्ञानी” पासून शेवटी ‘ज्ञ’ म्हणजेच “ज्ञानी” बनवून टाकते, मुजरा त्या मराठी भाषेला, आपणांस मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. अशा शुभेच्छा बिग बींनी दिल्या. बिंग बींनी मराठीतून शुभेच्छा देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीलाही त्यांनी शिवरायांना मराठीतून नमन केले होते.

कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने आज ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राज्यासह देशभरातील मराठी बांधवांकडूनही मराठी दिनानिमित्त विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

दरम्यान, बॉलीवूड सिनेसृष्टीतील ‘अँग्री यंग मॅन’ म्हणजेच अमिताभ बच्चन यांना क्वीन एलिझाबेथ २ आणि प्रिन्स फिलीप यांनी बकिंगहम पॅलेसमध्ये येण्यासाठी आमंत्रण दिले आहे. पण, बिग बी तेथे जाणार नसल्याचे कळते. या महिन्याच्या अखेरीस बकिंगहम पॅलेसमध्ये होणाऱ्या भारत-इंग्लंड सांस्कृतिक कार्यक्रमाचे आमंत्रण त्यांनी नाकारले आहे. ९० वर्षीय राणी एलिझाबेथ २ यांनी दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

अमिताभ हे सदर कार्यक्रमाला जाऊ शकत नसल्याने त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे कळते. पण, इतक्या भव्य कार्यक्रमाचे आमंत्रण बिग बींनी नाकारण्यामागे काय कारण असेल? मिड डे या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अमिताभ यांनी कामासाठी आधीच तारखा दिल्या असल्यामुळे लंडन येथे होणाऱ्या गालामध्ये ते जाऊ शकणार नाहीयेत. पण, त्यांनी आधीच याबाद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, या सन्मानाबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत. मात्र, सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असलेल्या अमिताभ यांनी याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.