हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्यांचे छायाचित्र एका उपक्रमाच्या प्रचारासाठी वापरल्याने बिहार पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवली आहे. माझे छायाचित्र वापरण्याबद्दलची कोणतीही पूर्वसूचना बिहार पोलिसांनी दिली नव्हती त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती बिग बी यांनी ट्विटरवरून दिली होती. त्यानंतर लगेचच बिहार पोलिसांनी बच्चन यांची माफी मागत त्यांचे छायाचित्र असलेली पोस्टर्स काढून टाकली.
नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या अधौरा जिल्ह्यातील तरूणांनी माओवाद्यांच्या प्रभावातून बाहेर पडले पाहिजे. त्यासाठी त्यांना शिक्षणाकडे वळवावे, या हेतूने पाटणा पोलिसांनी ‘अधौरा ३०’ नावाचा शैक्षणिक उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाच्या प्रसारासाठी त्यांनी अमिताभ बच्चन यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स तयार करून ते ठिकठिकाणी लावले होते. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून ‘बिहार पोलिसांनी माझे छायाचित्र वापरल्याचे वृत्त वाचले. हे बेकायदेशीर आहे. त्यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असे ट्विट क रताच पोलिसांनी ही पोस्टर्स काढून टाकली.
अमिताभ बच्चन यांचे छायाचित्र असलेली पोस्टर्स आम्ही नक्षलग्रस्त भागातील तरूणांना शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठीच वापरली होती. त्यात आमचा कुठलाही व्यावसायिक हेतू नव्हता. मात्र, त्यासाठी आम्ही त्यांची परवानगी घेतली नव्हती. तरी मी त्यांची माफी मागतो. आम्ही कायमूर भागात हे पोस्टर्स लावले होते, ते आता काढून टाकण्यात आले आहेत, अशी माहिती कायमूरचे पोलिस अधीक्षक उमाशंकर सुधांशू यांनी दिली आहे.