संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाला सुरुवातीपासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रत्येक अडथळा दूर करत आता कुठे या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णत्त्वास जात होतं, तोच पुन्हा एकदा या चित्रपटाच्या सेटवर नवा वाद पाहायला मिळाला. ‘स्पॉटबॉय’या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अभिनेता रणवीर सिंगचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड यांच्यात कडाक्याचं भांडण झालं असून त्यांच्या या भांडणामुळे चित्रीकरणसुद्धा थांबवण्यात आलं होतं.

‘पद्मावती’मधील अत्यंत महत्त्वाच्या दृश्याचं फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण सुरु असतानाच अचानक बाहेरुन येणाऱ्या हाणामारीच्या आवाजामुळे त्यात व्यत्यय येत होता. काही वेळाने तो आवाज वाढतच गेला. त्यावेळी चित्रपटाच्या क्रू मेंबर्सनीसुद्धा रणवीरच्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डला शांत राहण्याची ताकीद दिली. पण, त्यांच्यावर याचा काही फरक पडला नाही. हे प्रकरण इतकं वाढलं की शेवटी संजय लीला भन्साळी यांनाच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाहेर यावं लागलं.

त्यांनी बाहेर येऊन पाहिलं तेव्हा रणवीरचा ड्रायव्हर सूरज पाल आणि बॉडीगार्ड विनायक यांच्यात झालेला वाद त्यांच्यासमोर आला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रणवीरच्या ड्रायव्हरला दोन महिन्यांचा पगार देण्यात आला नव्हता. त्यामुळे त्याने रणवीरच्या मॅनेजरकडे थकलेल्या पगाराची मागणी केली. पण, मॅनेजरने त्यांचं म्हणणं ऐकून न घेता बॉडीगार्डला सांगून त्या ड्रायव्हरला बाजूला नेण्यास सांगितलं. बॉडीगार्डने त्यानंतर ड्रायव्हरला मारण्यास सुरुवात केली आणि या वादाला वेगळंच वळण मिळालं. त्यावेळी मॅनेजरने मध्ये पडत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या सर्व प्रकरणानंतर रणवीरने ड्रायव्हरला कामावरुन काढून टाकले.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

कामावरुन काढण्याबद्दल समजल्यानंतर ज्यावेळी त्याच्या ड्रायव्हरने थकलेल्या पगाराची मागणी केली. त्यावेळी त्याला एका दिवसाच्या आत पगार देण्यात येईल असं सांगण्यात आलं. सूरजने त्याचा पगार मिळण्यासंबंधी रणवीरच्या बहिणीशीही संपर्क साधला पण, त्याचा काहीच उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आता तो रीतसर तक्रार करण्याच्या तयारीत असल्याचंही म्हटलं जात आहे.