विकृत कृत्यामुळे बिगबॉसच्या घरातून धक्के मारुन बाहेर पडलेल्या स्वामी ओमची टेलिव्हिजनवर झळकण्याची हौस भागल्याचे दिसत नाही. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये अपमानित होऊन बाहेर पडल्यानंतर आता  स्वामी ओम आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये जाण्याचे स्वप्न पाहत आहे. बिग बॉसच्या आयोजकांसह स्पर्धकांची डोकेदुखी बनलेला  स्वामी ओम आता ‘नच बलिये’मध्ये नाचण्यासाठी उतावळा झाला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये जोडीने सहभागी होण्याची अट असताना स्वामी ओमने या कार्यक्रमातील जोडीला एकटा टक्कर देण्याचे वक्तव्य करत पुन्हा एकदा स्वत:कडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. टेलिव्हिजनवर पुन्हा झळकण्यासाठी त्याने आता ‘नच बलिये’च्या आयोजकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे.

‘नच बलिये’च्या आठव्या सत्रात सहभागी करुन घेण्यासाठी तो आयोजकांना विनवणी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासाठी स्वामी ओमने ‘नच बलिये’च्या आयोजकांना दूरध्वनीवरुन संपर्क साधल्याचे समजते. दरम्यान आयोजकांनी ओम स्वामीला कार्यक्रमाची नियमावली सांगत या कार्यक्रमामध्ये फक्त खऱ्या खुऱ्या जोडीला प्रवेश मिळतो, असे सांगितले. यावर स्वामी ओमने आयोजकांना आपल्यातील गुण पुन्हा एकदा दाखवून दिला. माझ्या सोबत जोडीला कोणी नसले, तरी मी या स्पर्धेत सहभागी होऊन सर्वांना पराभूत करु शकतो, असे त्याने म्हटले. आयोजकांनी नियमावली जाहीर केल्यानंतरही तो त्यांना मी या स्पर्धेसाठी पात्र असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करत होता. त्याची बोलती बंद करण्यासाठी आयोजकांना शेवटी फोन कट करावा लागला.

स्वामी ओमने बिग बॉसच्या दहाव्या पर्वात विकृत कृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या कार्यक्रमात दिवसागणिक त्याचे रुप बाहेर आल्याचे पाहायला मिळाले. सलमान खानसोबतच वाद आणि बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांशी विकृत वागण्यामुळे त्याला स्पर्धेतून धक्के देऊन बाहेर काढण्यात आले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही स्वामी ओम  वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न करताना दिसला होता. सध्याचे त्याचे हे वर्तन पाहता अपमान करा, पण कॅमेरा माझ्याकडे फिरवा, अशाच अविर्भावात स्वामी ओम असल्याचे दिसते.