बिग बॉस हाउसमध्ये भांडणांमुळे प्रसिद्धीस आलेली प्रियांका जग्गा बिग बॉस १०च्या पहिल्या एलिमिनेशन राउंडमध्येच बाहेर पडली. पहिल्या एलिमिनेशन राउंडमध्ये शेवटी चार स्पर्धक राहिले होते. यांमध्ये गौरव चोप्रा, मन्नू पंजाबी, मोनालीसा आणि प्रियांका जग्गा यांचा समावेश होता. प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारे प्रियांका जग्गा शोमधून बाहेर पडल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर सलमानने प्रियांकाशी संवाद साधला. तू कुठे कमी पडलीस असा प्रश्न सलमानने तिला केला. त्यावर प्रियांका म्हणाली की, मलाचं माहित नाही मी कुठे कमी पडले. माझ्या मते मी चांगल्या पद्धतीने खेळत होते. बहुदा कुठेतरी मी जास्तच चर्चेत राहिले असावी. गेल्या आठवड्यात प्रियांका बरीच चर्चेत राहिली होती. गेल्या आठवड्यात बिग बॉसने दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी प्रियांकाने कपड्यांमध्येच टॉयलेट केल्याने, ती अधिकच चर्चेत आली. बहुदा तिचे जास्त चर्चेत राहणेच प्रेक्षकांना रुचले नसावे. प्रियांका बाहेर पडताच तिचा साथीदार मन्नू पंजाबी रडताना दिसला.

मन्नूचा हा भावनिक स्टंट मात्र प्रेक्षकांना काही रुचला नाही. दरम्यान, याआधी शनिवारी बिग बॉस १० चा सूत्रसंचालक आणि अभिनेता सलमान खान याने घरातील सर्व सदस्यांशी संवाद साधून त्यांना काही प्रश्न केले. मात्र, यावेळी स्वामीजी सर्वांच्या निशाण्यावर होते. सर्व सदस्यांनी स्वामीजींबाबत सांगण्यास सुरुवात केली. यावरून पहिल्याच आठवड्यात सर्वजण स्वामीजींना किती कंटाळले आहेत ते कळते. त्यांच्याविषयी बोलताना रोहन म्हणाला की, स्वामीजी या घराचेच नाही तर पूर्ण देशाचे खलनायक आहेत. तर लोपामुद्रा म्हणाली की, मला स्वामीजींची भीती वाटते.

३२ वर्षीय प्रियांका जग्गा एक सर्वसामान्य सदस्य म्हणून बिग बॉसच्या घरात आली होती. प्रियांका दिल्लीमध्ये मार्केटिंग रिक्रूटर आहे. ती बोल्ड आणि सुंदर तर आहेच शिवाय ती एक आईही आहे. प्रियांका जग्गा मुइस या नावाने तिला अनेकजण ओळखतात. ३२ वर्षीय प्रियांकाचा जन्म १७ डिसेंबर १९८४ मध्ये झाला. ती इतरांपेक्षा थोडी जास्तच फॅशनेबल आहे. ‘मी एक मॉर्डन आई आहे. मी रुढीवादी नक्कीच नाही, त्यामुळे नियम तोडताना मला काहीच वाटत नाही. अनेकदा लोक मला आणि माझ्या फॅशनकडे सारखे बघत असतात. पण मला काहीच फरक पडत नाही. लोकं माझ्याबाबतीत काय विचार करतात याचा विचार मी अजिबात करत नाही.’, असे तिचे म्हणणे होते. दिल्लीच्या पेज थ्री वर्तुळात सतत दिसणाऱ्या प्रियांकाला नृत्य, बॅडमिंटन, ट्रेकिंग, आणि आपल्या मित्र परिवारासोबत वेळ घालवणं पसंत आहे.