‘बिग बॉस’ नामक शोसाठी सलमान खान भलेही कोटय़ानुकोटी मानधन घेत असेल. त्याच्यामुळे हा शो चर्चिलाही जात असेल आणि त्याचा टीआरपीही जास्त असेल, मात्र बुद्धिजीवी वर्गासाठी ‘बिग बॉस’ हा सगळ्यात खालच्या दर्जाचा शो असल्याची टीका सलमान खानला जाहीरपणे समाजमाध्यमावर ऐकावी लागली आहे. दरवेळी ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाची घोषणा झाली की या शोमध्ये स्पर्धक कोण असणार? याबद्दलच्या तर्कवितर्काना उधाण येते. नानाविध क्षेत्रातील सेलिब्रिटींना विचारणा होते. अनेक सेलिब्रिटींनी याआधी ‘बिग बॉस’ पासून दूर राहणे पसंत केले आहे. मात्र पहिल्यांदाच या शोच्या दर्जाबद्दल इतक्या जाहीरपणे टीकाटिप्पणी केली गेली आहे.

‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वासाठी हो-नाही करत सलमान राजी झाला असला तरी अजून स्पर्धकांसाठी चाचपणी सुरू आहे. महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यासाठी झगडलेल्या तृप्ती देसाईंपासून अनेकांना विचारणा झाल्याचे सांगण्यात येते. व्यंगचित्रकार आणि प्रभावी वक्ता म्हणून प्रसिद्ध असलेल्या के. व्ही. गौतम यांनाही या शोसाठी विचारणा झाली होती पण त्यांनी शोला नकार दिला. गौतम यांनी नकार दिल्यानंतर त्यांना अनेकांनी ट्विटर-फेसबुकवरून नकाराचे कारण विचारले.

अखेर सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. मी एक विचारवंत आहे, वक्ता म्हणून वेगवेगळ्या विषयांवर मी लोकांना व्याख्यान देतो. ‘बिग बॉस’सारख्या शोमध्ये सहभाग घेतला तर माझ्या या विचारी प्रतिमेला तडा जाईल, असे वाटल्यानेच हा शो नाकारल्याचे गौतम यांनी म्हटले आहे.

बुद्धिजीवींचा एक मोठा वर्ग आहे, ज्यांच्या मते ‘बिग बॉस’ हा अगदी खालच्या दर्जाचा शो आहे. मी शोमध्ये सहभागही घेतला नव्हता तरी मला शोसाठी विचारणा झाल्याची माहिती मिळताच उच्चभ्रू वर्गासाठी माझे नियोजित व्याख्यान रद्द करण्यात आले. विचारवंतांमध्ये या शोची महती अशी असल्याने आपण स्वत:ला या शोपासून दूरच ठेवू इच्छितो, असे गौतम यांनी म्हटले आहे.