आपण कोणत्या शहरात राहतो, हे महत्वाचे नाही. मोठे होण्यासाठी केवळ मुंबई, बंगळुरू अशा शहरांमध्ये वास्तव्यास असले पाहिजे, असेही नाही. नागपूरसारख्या शहरात राहूनही मोठे होता येते. त्यासाठी आवश्यकता आहे ती मोठय़ा विचारांची. मेट्रो शहरांमध्ये राहून लहान विचार केलेला माणूस मोठा होऊ शकत नाही. मात्र, नागपूरसारख्या लहान शहरांमध्ये राहूनही मोठा विचार आणि इच्छाशक्तीच्या बळावर माणूस मोठा होऊ शकतो आणि तेच आपल्या यशाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन फेमिना मिस इंडियाची उपविजेती आणि ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमध्ये तृतीय ठरलेली लोमामुद्रा राऊतने केले.

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिसरी आल्यानंतर लोपामुद्रा ही प्रथमच नागपुरात दाखल झाली. यानंतर तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ती बोलत होती. आजवरचे यश आपण स्वत:च्या भरवशावरच मिळविले आहे. सौदर्य स्पर्धा किंवा चित्रपट संस्कृतीत आपल्या पाठीवर कुणाचेच हात नसतानाही यशस्वी झाले. आपण तिसऱ्या क्रमांकावरही समाधानी आहोत. तिसरा क्रमांक हा सौदर्यवतींच्या स्पध्रेत विजयाचे प्रतीक आहे, असेही ती म्हणाली. मोठय़ा शहरांमध्ये राहूनच यश मिळते, असे नाही, तर नागपूरसारख्या लहान शहरांमध्ये राहून मोठा विचार केल्यास माणसाला मोठे होता येते, असा संदेशही तिने नागपुरातील तरुणाईला दिला.

चित्रपट व मालिकांसाठी विचारणा

सलमान खानमुळे ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाले होते. सलमान खानचा स्वभाव चांगला असून तशा कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळण्यासाठी सौभाग्य लागते. बिग बॉसनंतर आपल्याला आता तीन चित्रपट आणि तीन मालिकांसाठी विचारणा झाली आहे, परंतु कोणताही निर्णय विचारपूर्वकच घेईल, असे सांगीन यावेळी तिने बिग बॉसचे आभार मानले.