अचानक एकेदिवशी घरातील जुना अल्बम हाती लागावा आणि त्यातील आपले जुने फोटो पाहून अनेक आठवणींनी मन भरुन जावं, असं अनेकदा होतं. सध्या स्मार्टफोनच्या फोटो गॅलरीमध्येच आपण सर्व फोटो साठवतो. मग फोनमधील ही गॅलरी कधी सहज पाहिली तर कित्येक जुन्या आठवणी डोळ्यांसमोर तरळतात. अशाच आपल्या काही जुन्या आठवणी अभिनेत्री बिपाशा बासूने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत.

आपले सहकारी, मित्रमैत्रिणींसोबतचे काही जुने फोटो बिपाशाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोमध्ये किशोरवयातील बिपाशा पाहायला मिळतेय. तिचा हा लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. फोटोग्राफर फारुख चोथिया यांनी काढलेला एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, ‘माझ्या आवडत्या फोटोग्राफरने काढलेला माझा सर्वांत आवडता फोटो. माझ्या किशोरवयात ही आठवण मला दिल्याबद्दल धन्यवाद!’

यासोबतच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचेही काही फोटो तिने पोस्ट केलेत. हे फोटो पाहता बिपाशाच्या लूकमध्ये झालेला कमालीचा बदल सहज लक्षात येतोय. या फोटोंमध्ये ती सेलिब्रिटी फिटनेस एक्सपर्ट सुझान दधिच, मॉडेल दीपनिता शर्मा, फॅशन डिझायनर रॉकी स्टार, व्हिडिओ जॉकी अनुशा दांडेकर आणि दिग्दर्शक विशाल मुल्ल यांच्यासोबत पाहायला मिळतेय. मॉडेल दीपनिता आणि बिपाशा एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी आहेत. २०१२ मध्ये ‘जोडी ब्रेकर्स’ चित्रपटासाठी काम करताना दोघी एकाच फ्लॅटमध्ये राहत होत्या. दीपनितानंही एक फोटो शेअर करत ‘बिपाशासोबत घालवलेला मजेशीर वेळ,’ असं कॅप्शन दिलंय.

वाचा : हा चित्रपट ‘बाहुबली’ला देतोय टक्कर

गेल्या वर्षी बिपाशा आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर विवाहबद्ध झाले. २०१५ मध्ये या दोघांनी ‘अलोन’ चित्रपटात एकत्र भूमिका साकारली होती.