बॉलिवूडमध्ये बोल्ड आणि मादक अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत आज तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्याच्या घडीला मल्लिका बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरीही तिचे अनेक चाहते आहेत. हरियाणाच्या हिसारमध्ये जन्मलेल्या मल्लिकाचे खरे नाव आहे रीमा लांबा. घरातल्यांशी खोटं बोलून रीमापासून मल्लिका बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास फारच रंजक आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मॉडलिंग क्षेत्राकडे तिची ओढ वाढली. मल्लिकाच्या या आवडीला तिच्या घरातल्यांचा विरोध होता. पण, तरीसुद्धा तिने या क्षेत्रात तिचे नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.

मल्लिकाचा रीमा पासून ते अगदी मल्लिका होण्यापर्यंतचा प्रवास तिच्या चित्रपटांप्रमाणेच रंजक आहे. २०१० मध्ये मल्लिकाने दिल्लीस्थित करण सिंग गिलसोबत लग्न केले होते. पण, लग्नाला दोन वर्षसुद्धा पूर्ण नाही झाली तोवर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला. सध्या मल्लिका सोशल मीडियावर तिच्या बहुचर्चित परदेशी प्रियकरासोबतच्या फोटोमुळे चर्चेत आहे. पण, मल्लिकाने या सर्व बातम्यांना धुडकावत ‘तो’ केवळ तिचा चांगला मित्र असल्याचे म्हटले आहे.

चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मल्लिका अमिताभ बच्चन यांच्यासह ‘बीपीएल’ आणि शाहरुख खानसह ‘सॅन्ट्रो’च्या जाहिरातींमध्ये झळकली आहे. अभिनेता इम्रान हाश्मीसोबतचा तिचा ‘मर्डर’ हा चित्रपट विशेष चर्चेत राहिला. त्यानंतर ‘बचके रहना रे बाबा’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’, ‘वेलकम’ आणि अशा काही चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. बॉलिवूडमध्ये विविध चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर मल्लिकाने हॉलिवूड चित्रपटामध्येही काम केले. भारतासोबतच परदेशांमध्येही विविध कार्यक्रमांच्या निमित्तानेही मल्लिकाच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. .