बॉलीवूड बादशहा शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘रईस’ हा कोणत्या ना कोणत्या वादात सापडल्याचेच चित्र सध्या आहे. नुकतेच भारतीय जनता पार्टीचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून त्याद्वारे शाहरुख खानवर निशाणा साधला आहे.

कैलाश विजयवर्गीय यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेय की, जो ‘रईस’ देशाचा नाही तो कोणत्याच कामाचा नाही आणि एका ‘काबिल’ देशभक्ताची साथ सर्वांनीच द्यायला हवी (‘जो ‘रईस’ देश का नहीं वो किसी काम का नहीं और एक ‘काबिल’ देशभक्त का साथ, तो हम सभी को देना ही चाहिए।’) . या पोस्टसह विजयवर्गीय यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांचा फोटो असून त्यावर लिहलेय की, आता वेळ देशातील ‘काबिल’ जनतेची आहे. जो देशाच्या ‘काबिल’ आहे त्याचा अधिकार कोणीच बेइमान ‘रईस’ हिसकावून घेऊ शकत नाही.

विजयवर्गीय यांनी कुठेही शाहरुख खानच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण, त्यांनी नकळत शाहरुख आणि त्याच्या आगामी ‘रईस’ चित्रपटावर निशाणा नक्कीच साधला आहे. शाहरुख खानचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबिल’ हे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहेत. विजवर्गीय यांनी शाहरुखवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी म्हटलेले की, शाहरुख भारतात राहतो. पण त्याचे मन हे पाकिस्तानामध्ये असते. पण, त्यानंतर त्यांनी ते ट्विट काढून टाकले होते.