प्रत्येक काळातील विविध वैशिष्ट्यांसह माणूस आपल्या आयुष्याचा प्रवास सुरु ठेवतो पण पुढील काळातील अनेक बदलांशी जुळवून घेणे त्याला अवघड जात असते. या वस्तुस्थितीला काही जण मात्र अपवाद असतात. म्हणूनच तर कुतूहल वाढते. अशी दोन हुकूमी नावे घ्यायची तर अमिताभ बच्चन व लता मंगेशकर यांची घ्यायलाच हवीत. नावे वाचून काहीसे गोंधळात पडलात की काय? लताजी संगीत क्षेत्रातील एखाद्याचा वाढदिवस लक्षात ठेवून ट्विट करतात. तसेच एखाद्याचा जन्मदिवस व स्मृतिदिनीही याच माध्यमातून त्या व्यक्तीचे एखादे वैशिष्ट्य वा आठवण सांगतात. बिग बी तर टायगर श्रॉफ, सुशांतसिंग राजपूत, दिशा पटानी, कियारा अडवाणी या अगदीच नवीन कलाकारांपेक्षाही अधिक प्रमाणात सोशल नेटवर्किंग साइटवर कार्यरत आहे. आपल्या जुन्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेनुसार काही छायाचित्रे व आठवणी सांगत ते छानसा ‘फ्लॅशबॅक’च जणू उभा करतात. तात्पर्य तो फक्त नवीन माध्यमातून आनंदच घेतोय असे नव्हे तर माहिती व मनोरंजनाचा साठाही समोर आणतोय. एक प्रकारची ही सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकीच म्हणायला हवी. यामुळेच अमिताभ आजच्या पिढीतील चित्रपट रसिकांशीही जोडला गेलाय. हे आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशन व प्रदर्शनास उपयुक्त ठरणारे आहे हे समजण्याची व्यावसायिक दृष्टी बिग बींकडे आहे. काहीजण त्याच्या या कृतीला कदाचीत हव्यास, असेही म्हणतात. पण बिग बी अशा टीकेपेक्षाही जास्त ‘उंची’ गाठण्यात यशस्वी ठरलेत व आपल्या ट्विटला मिळणाऱ्या कमेंट्स, रिट्विट आणि लाईक्सने खूश राहत असावेत. वयाच्या पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर यातून बिझी रहात रहात आनंद मिळवणे ही एक सकारात्मक वृत्तीच तर आहे…

अशोक सराफ, अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी या मराठी कलाकारानीही याच सोशल नेटवर्किंग साइट्सला आपलेसे केल्याचा छानसा प्रत्यय येतोय. अशोक सराफ तर सांगत होते, दोन्ही घरचा पाहुणा (१९७१) या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळची प्रसारमाध्यमे आणि आता तब्बल सेहचाळीस वर्षानंतरचा मीडिया यात झालेला बदल मलाच अचंबित करणारा आहे. पूर्वी मराठी वृत्तपत्रात आठवड्यातून फक्त एकदाच म्हणजे शुक्रवारी नवीन चित्रपटाची बातमी व परीक्षण आले तरी मराठी चित्रपटाची भरपूर प्रसिद्धी होई व ते यशस्वी देखील होत. आता कितीही प्रसिद्धी केली तरी थोडीच की काय असे ‘शेंटीमेंटल’च्या निमित्ताने वाटतंय, अशोक सराफच्या बोलण्यात कौतुक जाणवले.
अशोक सराफप्रमाणे अश्विनी भावेनेही ‘मांजा’च्या निमित्ताने मुद्रित माध्यम ते डिजिटल असा चौफेर प्रवास केला. तो देखील न कंटाळता, न थकता व भरभरुन आनंद घेत. मृणाल कुलकर्णीने तर केव्हाच फेसबुक, ट्विटरवर स्वतःला अ‍ॅक्टिव्ह ठेवलंय. अशा पद्धतीने नवीन पिढीशी आपण जोडले जातानाच आपण कोणत्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात होतो, याचीही ती फोटोतून माहिती देत असते. तिची फोटोची निवड छानच असते. ‘माझं सौभाग्य’ (१९९४) पासूनची मृणालची वाटचाल दोन दशकांपेक्षा जास्त. पण सोशल साइटवर त्याचे तेच भान कोणाला येऊ देत नाही ही वृत्ती महत्त्वाची. हे सगळे येते कोठून? तर आपल्या प्रत्येक कामाचा आनंद घेण्याच्या वृत्तीतून. मृणालचे विशेष म्हणजे एकाच वेळेस तिचे सर्वच प्रकारचे पुस्तक वाचन सुरु असतेच. अश्विनी अधूनमधून येथे येत जात असल्याने ती अमेरिकेतील वास्तव्यास इकडच्या मनोरंजन विश्वापासून दूरच रहात असेल. येथे काय काय बरे चाललंय याची तिला काहीच खबर नसेल, असे मुळीच समजू नका. आपण ‘ग्लोबल व्यक्ती’ (वा कलाकार) आहोत व आजच्या जगात आपण अगदी कोठेही असलो तरी आजच्या काळातील संपर्क व प्रसार माध्यमातून जगभरात कुठे काय काय बरे चाललंय याबाबत मी अपडेट असते असेच तिचे म्हणणे आहे. अश्विनीने फेसबुक लाईव्ह मुलाखतीत रंग भरल्याचे विशेष आश्चर्य वाटले नाही. एक तर तिची नवीन माध्यमांशी ओळख आहे आणि महत्वाचे म्हणजे चित्रपट संदर्भात मुलाखत कशी द्यावी. यात ती व वर्षा उसगावकारदेखील नक्कीच आदर्श ठरावी. अशोक सराफने वयाच्या सत्तरीत रेडिओ एफएम चॅनल, फेसबुक लाईव्ह याला न कंटाळता वारंवार त्यात रमणे पसंद केले हे विशेषच! या माध्यमात चित्रपट रसिक व श्रोत्यांकडून अगदी कोणताही कसाही प्रश्न येऊ शकतो. एखादा प्रश्न चीड आणणारा देखील असू शकतो. तर एखाद्या राजकीय प्रश्नावर काहीही न बोलणे गरजेचे असते. म्हणजेच कमालीचे सावध असावे लागते. मितभाषी अशोकला ते छानच जमल्याचे दिसले तेव्हाच तो या नवीन माध्यमातून दिलखुलास व्यक्त होतोय हे देखील जाणवले. अजिबात कंटाळून न जाता त्याने सर्वच माध्यमातून विक्रमी मुलाखती दिल्या. ही उर्जा कशातून येते? अश्विनीनेही अजिबात न कंटाळता पुणे/ नाशिक/ औरंगाबाद असे दौरे का केले? खरंतर हे एस्टॅब्लिश तारे. त्यांच्या केवळ नावावर त्यांच्या चित्रपटाची तिकिटे विकली जाऊन हाऊस फुल्लचा फलक कायम राहायला हवा. पण आज चित्रपट प्रमोशन व प्रदर्शन याचे सगळेच फंडे बदललेत याचे नेमके भान त्यांना आहे. आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यास आपणच मेहनत घ्यायला हवी असे आजही त्याना वाटले यात त्यांची चित्रपट या माध्यम व व्यवसाय याच्याशी असलेली बांधिलकीच स्पष्ट होतेय. ‘पोटासाठी अथवा पैशासाठीच कला’ या आजच्याच वास्तवापासून ते दूर राहूनच नवीन माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. तात्पर्य ते व चित्रपट रसिक यातील अंतरही या नवीन माध्यमातून कमी कमी होत गेले. त्यांच्यात सतत नवीन काही शिकण्याची असण्याची प्रवृत्तीही त्यांना नवीन माध्यमाशी जोडण्यास उपयुक्त ठरलीये. ‘शाब्बास सुनबाई’ (१९८६) या पहिल्याच चित्रपटापासून अश्विनीशी माझा अतिशय उत्तम परिचय आहे. आपल्या अनेक चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये तिने विशेषच रस घेतल्याचे अनेकदा अनुभवलयं. या मूळ प्रवृत्तीनेच ती नवीन ‘तरुण माध्यमा’त आपोआप सामावली गेलीय….

काळासोबत बदलताना नवीन जगाचेही आपण वाटणे याचा मार्ग आनंदातून जातो हेच तर येथे स्पष्ट होतेय. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन असो अथवा अशोक सराफ, अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी असोत. त्यांचे सोशल नेटवर्किंग साइट्समधले सातत्याने वावरणे त्यांनाच तजेलदार ठेवणारे आहे आणि आपण त्यांचे कौतुक करावे असेही आहेच…
– दिलीप ठाकूर