काही सॉलिड पाहिले नि पब्लिक बहुत खुश हुई!
पब्लिकच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे नेहमीची चौकट मोडण्यात यशस्वी ठरलेला चित्रपट असा काही डोक्यावर घ्यावा की तो ट्रेन्ड सेटर चित्रपट ठरावा. दोन्ही ‘बाहुबली’च्या तुफान यशाने याच पब्लिकने जणू सांगितलय, पडदादेखिल कमी पडेल असे महामनोरंजन द्या आम्ही असेल त्या भावात चित्रपट पाहायला थिएटरमधे येऊ अन्यथा आमच्या मोबाईल स्क्रीनवर नवीन चित्रपट कधी बरे येऊन पोहोचलाय याची आम्हालाच खबर नसते. ते काही असो. पण आपल्या पब्लिकने जणू प्रत्येक काळात असेच काही नेहमीची चौकट मोडल्याचे पाहिले व ते असे आणि इतके काही इम्प्रेस झाले की त्या काळात त्या चित्रपटानी घसघशीत ज्युबिली यश मिळवलेच. पण काळ बराच पुढे सरकून देखील त्या चित्रपटांचा प्रभाव कायम आहे. सिनेमावेड्या पब्लिकनेच ते चित्रपट पुढील पिढीत नेले म्हणूयात ना? काही भारी उदाहरणेच देतो फिर यह बात समझ मे आयेगी… एका चित्रपटाला दोन मध्यंतर ही आज साधी आपण कल्पना देखील करू शकत नाही. शे सव्वाशे मिनिटाचाही एखादा चित्रपट थोडासा रेंगाळल्यासारखा वाटला तरी मोबाईलवर वॉट्सअॅप मेसेजवर लक्ष वाढते. फार पूर्वी असा मोबाईल नसला तरी चित्रपट रंगत नाही हे लक्षात येताच गाणे सुरु झाले रे झाले की चहा व टॉयलेट याच्या आठवणीने अनेक जण खुर्ची सोडत. अशा वेळेस दोन मध्यंतराचा चित्रपट? पण संकलक- निर्माता -दिग्दर्शक जर राज कपूर असेल तर? ‘संगम’च्या (१९६४) वेळेस त्याने प्रेम त्रिकोणाला दोन मध्यंतर देत रंगवले. महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांनी विनातक्रार हा चित्रपट डोक्यावर घेतला. म्हटलं ना, चौकट मोडण्यात यशस्वी ठरलेला चित्रपट रसिकांकडून चांगलाच स्वीकारला गेलाय. त्या काळात हे असे दोन मध्यंतराचे विशेषच अप्रूप हो. कारण कधी याची कल्पनाच केली नव्हती व सवयही नव्हती. तात्पर्य काळ कोणताही असू देत ते सॉलिड वाटायला हवे. ‘संगम’ची आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत. ती देखील असावीच लागतात. त्या काळातील तीन मोठे स्टार एकाच चित्रपटात हे विशेषच. एक नायक एक नायिका व एक खलनायक ही तेव्हाची चौकट. पण ‘संगम’मध्ये राज कपूर, वैजयंतीमाला व राजेंद्र कुमार असे तीन मोठे स्टार एकत्र. थीमनुसार युरोपचे भरपूर दर्शन व शंकर जयकिशन यांचे सुमधूर संगीत! आज हिंदी चित्रपट सतत नवनवीन देशाचा जणू शोध घेतोय पण ‘संगम’च्या वेळेस हिंदी चित्रपटातून युरोप दिसणे म्हणजे खूपच मोठे नाविन्य होते. प्रामुख्याने स्टुडिओत मोठ्ठा सेट लावणे व काश्मिर नैनितालला गाणी चित्रीत करणे याचे ते दिवस असतानाच युरोपचे भरपूर दर्शन म्हणजे ‘पैसा वसूल’ मनोरंजन! राज कपूरने आपल्याच ‘संगम’च्या यापासून प्रेरणा घेतच जणू असाच दोन मध्यंतरचा ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) निर्मित दिग्दर्शित केला. पण बराचसा भाग सर्कस दाखवण्यात गेल्याने जोकरची ही वयाच्या विविध टप्प्यावर तीनदा एकतर्फी प्रेमात पडल्याची गोष्ट रंगली नाही. तर फार रेंगाळली. अर्थात पब्लिकने चित्रपट नाकारण्यात फारसा वेळ घेतलाच नाही. म्हणून पहिला आठवडा संपतानाच लांबी कमी करून तो एका मध्यंतरचा केला….

चित्रचौकट मोडताना कल्पकता हवीच. ती नव्हती म्हणूनच ढूंढी दिग्दर्शित ‘अराऊंड द वर्ल्ड’ (१९६९) हा आपल्याकडचा पहिला सत्तर एम एम चित्रपट रसिकांनी नाकारण्यास फारसा उशीर केला नाही. जगभरातील महत्त्वाची पर्यटनस्थळे दाखवली म्हणजे चांगला चित्रपट कसा होईल? रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) सत्तर एम एम व स्टीरिओफोनिक साऊंड अशा भव्य स्वरूपात पाहताना आपण काही तरी भन्नाट वा सॉलिड पाहतोय या अनुभवाने प्रेक्षक कमालीचे थ्रील झाले. तेव्हा तो संपूर्ण मुंबईत फक्त मिनर्व्हा थिएटरमधेच भव्य सत्तर एम एम होता. इतरत्र पस्तीस एम एम स्वरूपात होता. ‘शोले’ पाहायचा वा अनुभवायचा तर तो मिनर्व्हातच हे तेव्हाचे मुंबईकरांचे सामाजिक सांस्कृतिक वेड होते. कारण मोठीच रुपेरी फ्रेम हे तेव्हा नाविन्य होते.

अहो तेव्हा कुठे पस्तीस तर कुठे त्याहीपेक्षा लहान पडद्यावर चित्रपट पाहायची व काही दोष असणारी साऊंड व्यवस्थेत चित्रपट पाहायची सवय ना? अशा सवयीत एकदम मालगाडी जणू आपल्याच जवळच आहे, घोडेस्वारीचा धुरळा पाहायला/ ऐकायला मिळतोय हे सॉलिड थ्रीलच हो. ‘शोले’ने ही अशी चित्रचौकट मोडली व रसिक त्यावर विलक्षण फिदा झाले. आजही विविध कारणास्तव ‘शोले’चा संदर्भ येतो यातच बरेच काही आले. ‘छोटा चेतन’ (१९८६) या पहिल्याच थ्रीडी अर्थात त्रिमिती चित्रपटाबाबत हेच घडले. तसा हा मूळचा तमिळ चित्रपट हिंदीत डब होऊन आला. मेट्रो थिएटरमधे झळकताना तात्कालिक प्रेक्षकांना ‘चष्मा लावून चित्रपट पाहा’ ही कल्पनाच मोठी थ्रील होती. आणि मग पडद्यावरची पात्रे खूपच जवळची वाटतात, शस्त्रे अंगावर रोमांच आणतात हे सगळेच रोमांचक होते. हा चष्मा हो कसला अशी काहीशी उत्सुकता वाढवणारी तेव्हा प्रतिक्रिया होती. हा सगळाच अनुभव नवीन म्हणूनच चित्रपट सुपर हिट! त्यानंतर ‘शिवा का इन्साफ’, ‘सामरी’ इत्यादी थ्रीडी चित्रपट आले. पण त्यात एक मोठीच गफलत होती. छोटा चेतन बालप्रेक्षकांची भरपेट करमणूक करणारा होता. त्यांच्यासोबत पालकही चष्माधारी होत रमले. तेच तर खास वैशिष्ट्य ठरले. कारण आपण असा काही चित्रपट पाहू याची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती. काही वर्षांनी म्हणजेच १९९७ साली याच छोटा चेतनमध्ये उर्मिला मातोंडकरचे एक नृत्य गीत टाकत चित्रपट रिपिट रनला प्रदर्शित झाला. तोपर्यंत बालप्रेक्षकांची नवीन पिढी आल्याने चित्रपट हिट. नेहेमीपेक्षा वेगळे म्हणतो त्याचा यशस्वी मार्ग असा देखील आहे. सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ (१९९४) चित्रपटभर लग्नसोहळा हे देखिल नाविन्यपूर्ण होते. एक अख्खा चित्रपट असा असू शकतो याची प्रेक्षकांनी अपेक्षाच केली नव्हती. असे धक्कातंत्र हा यशाचा फॉर्म्युला होऊ शकतो. बाहुबलीचे दोन्ही भाग अगदी तसाच तर फिल देतात. कल्पनेच्या पलीकडले भव्य विश्व व त्याची अफाट/ अचाट तंत्रज्ञानात मांडणी हे सगळेच एकमेकांत गुंतलय व अचंबित करते. प्रत्येक काळात हे असेच काही नवे घेऊन यायला हवे तर निर्माता दिग्दर्शकाने काळाच्या पुढचा विचार करायलाच हवा. गुरुदत्तने केला व आपल्या देशातील पहिला सिनेमास्कोप चित्रपट ‘कागज के फूल’ (१९६४) प्रेक्षकांसमोर आणला. आशयदृष्ट्या चित्रपट सकस होता. एका यशस्वी दिग्दर्शकाची शोकांतिका त्यात होती. गुरुदत्त दिग्दर्शक व नायक होता. पण नेहेमीपेक्षा वेगळीच फ्रेममधील (अर्थात आडवी मोठी) ही सकस भावनिक कलाकृती रसिकांनी नाकारली. काळ कोणताही असू देत चित्रचौकट मोडताना प्रेक्षक मनोरंजनालाच पसंती देतात हेच खरे….
– दिलीप ठाकूर