dilip-thakurएखादा स्टार कळत नकळतपणे समाजाला बरंच काही देत असतो.. विनोद खन्नाने व्यायामशाळेतील गर्दी वाढवली असे सांगितले तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण ती चक्क वस्तुस्थिती आहे. विनोद खन्नाच्या ‘हॅन्डसम’ व्यक्तिमत्त्वावर सत्तरच्या दशकातील युवा पिढी विलक्षण फिदा होती. शरीरयष्टी असावी तर विनोद खन्नासारखी असे तेव्हा युवकांना आवर्जुन वाटे.

विनोद खन्ना दक्षिण मुंबईतील गवालिया टॅंक मलबार हिलचा रहिवासी. त्यामुळे तो गिरगावकरांना जवळचा. तो स्वतः मराठी खूप छान बोले. मी स्वतः याचा छानसा अनुभव देखील घेतलाय. आपला पुत्र अक्षय खन्नाला ‘हिमालयपुत्र’ या चित्रपटाद्वारे त्याने अभिनयाच्या क्षेत्रात आणले त्यावेळेस डलहौसी येथील चित्रीकरणावेळेस मुंबईतील आम्हा काही मोजक्या सिनेपत्रकारांना त्याने डलहौसीचा दौरा घडवला, तेव्हा ‘व्हीके’च्या समजुतदारपणा व समंजसपणाचा उत्तम अनुभव आला. चित्रपटसृष्टीत व या क्षेत्रात भटकंती करणार्‍या पत्रकारांत तो ‘व्हीके’ या टोपणनावाने प्रसिद्ध होता. एकदा का मेकअप करुन सेटवर आला की ‘व्हीके’ व्यक्तिरेखेत शिरे. गुलजार यांनी आपल्या दिग्दर्शनातील ‘मेरे अपने’, ‘अचानक’, ‘लेकीन’, ‘मीरा’ अशा चार चित्रपटांतून व्हीकेला संधी दिली यावरून त्याच्या विलक्षण अभिनय क्षमतेचा प्रत्यय यावा. काही काळ तो मानसिक शांततेसाठी रजनीश भक्त झाला. त्या काळात तो चित्रपटसृष्टीपासून काही काळ दुरावला. पण मुकुल आनंदने ‘इन्साफ’व्दारे त्याला पुनरागमनाची संधी दिल्यानंतरचा चित्रपटाचा मुहूर्त सेट व पार्टीतील ‘व्हीके’ खूप शांत व विचारी वाटे.

राजकारणात प्रवेश केल्यावर तो पंजाबमधील गुरदासपुर लोकसभा मतदारसंघाचा भाजपचा खासदार झाला. ‘व्हीके’चा समाजकारणातील एक गुण सांगायलाच हवा. गुजरातमधील भूज येथील भूकंपग्रस्ताना तातडीने मदत केली पण त्याची बरेच दिवस बातमी मात्र होऊ दिली नव्हती. अशा किती तरी छोट्या छोट्या गोष्टीतून ‘व्हीके’चे माणूसपण अधोरेखित होते. लता मंगेशकर यांनी निर्मिलेला गुलजार दिग्दर्शित ‘लेकिन’चा राजकमल स्टुडिओतील मुहूर्ताच्या वेळेचा ‘व्हीके’चे सर्वांशीच आपुलकीने वागणे आजही स्पष्ट आठवतेय. त्या चित्रपटात त्याच्यासोबत डिंपल, अमजद खान होते. ‘व्हीके’ने ‘हमशकल’ चित्रपटातून दुहेरी भूमिका साकारली. रुप कादर हा मराठीतील निर्माता त्या चित्रपटाचा निर्माता होता. ‘व्हीके’ म्हणजे पडद्यावर जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणारच हा रसिकांच्या एका पिढीला असणारा विश्वास त्याची मोठीच मिळकत ठरावी.
– दिलीप ठाकूर