बायोपिकला बॉलिवूडमध्ये मिळणारं यश पाहता आता याच आधारे अनेक निर्माते- दिग्दर्शकांनी त्यांचा मोर्चा या दिशेने वळवला आहे. महेंद्रसिंह धोनी, सायना नेहवाल, कपिल देव, खली यांच्यामागोमाग आता आणखी एका खेळाडुचा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. तिच्या आयुष्यात आतापर्यंत घडलेल्या काही महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार असून, ‘वायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ने त्यासाठीचे सर्व हक्कही मिळवले आहेत.

भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व करत नावलौकिक मिळवणाऱ्या मितालीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट साकारला जाणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. ‘वायकॉम १८’शी संलग्न अजित अंधारे यांनी याविषयीची माहिती दिल्याचं वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलं आहे. ‘मिताली राजसोबत अशा प्रकारे जोडलं जाणं ही अभिमानास्पद बाब आहे. महिला क्रिकेटसंघाच्या यशात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्यांमध्ये मितालीचं महत्त्वाचं योगदान आहे’, असं ते म्हणाले.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

मितालीच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, तिची भूमिका साकारण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार हे तर नक्कीच. तिची आतापर्यंतची कारकीर्द पाहिली तर, वयाच्या १६ व्या वर्षी तिने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्या वर्षीच तिने पहिलं शतकही ठोकलं होतं. तेव्हापासूनच तिला महिला क्रिक्रेटमधील ‘सचिन तेंडुलकर’ म्हणून संबोधलं जाऊ लागलं. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये ६००० धावा पूर्ण करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू म्हणूनही नावाजली गेली. तेव्हा आता मितालीची ही यशस्वी खेळी आणि तिचं खासगी आयुष्य या सर्व गोष्टींना बायोपिकच्या माध्यमातून न्याय मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.