१ मे हा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राविषयी असणारं प्रेम, आदर आणि आपल्या जबाबदारीची जाणिव करुन देणारा हा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन. या दिवशी अनेकजण आपापल्यापरिने महाराष्ट्र दिन साजरा करत असतात. सोशल मीडियावर महाष्ट्र दिनाचे मेसेज फॉरवर्ड करण्यापासून ते अगदी गड-किल्ल्यांवर जाऊन अभिमानानं भगवा झेंडा फडकवण्यापर्यंतच्या शकला लढवत हा दिवस साजरा करण्यात येतो. याचाच अंदाज घेत अभिनेता आमिर खानने महाराष्ट्र दिनाचे महत्त्व ओळखत अनोख्या मार्गाने हा खास दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये योगदान देत महाराष्ट्र दिन साजरा करण्याचं आवाहन परफेक्शनिस्ट आमिरने केलं आहे.

आमिरने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये पत्नी किरण रावसोबत तो महाराष्ट्र दिनी शहरी भागात राहणाऱ्यांनाही वॉटर कप योजनेत हातभार लावण्यास सांगत आहे. १ मे हा दिवस जर तुम्हीही अशा अनोख्या मार्गाने साजरा करणार असाल तर ‘पानी फाऊंडेशन’तर्फे एक वेबसाइट सुरु करण्यात आली आहे. या वेबसाइवर नाव नोंदणी करुन तुम्हीही पाणलोट क्षेत्राच्या या कामात खारीचा वाटा उचलू शकता. या वेबसाइटसंबंधीची अधिक माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ‘चला गावी’ या टॅगलाइनअंतर्गत ‘पाणी फाऊंडेशन’ने श्रमदानासाठीचे हे आवाहन केल्यामुळे खेडेगावांकडे जास्त ओढ असणारा मोठा शहरी वर्ग या उपक्रमात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमिर खानने राबवलेल्या या योजनेमध्ये आतापर्यंत अनेक गावांनी सहभाग घेतला असून हा उपक्रम खरंच प्रशंसनीय आहे. महाराष्ट्रावर घोंगावणाऱ्या दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी ही संकल्पना अंमलात आणली जात आहे. या समाजोपयोगी उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या गावांतील गावकऱ्यांना पाणी वाचवण्यासाठीच्या तंत्राचे प्रशिक्षण देण्यात येत असून याच प्रशिक्षणाच्या सहाय्याने गावकऱ्यांच्याच प्रयत्नांनी खेडेगावांना दुष्काळमुक्त करण्याचा मानस आहे. तेव्हा आता महाराष्ट्र दिनी आमिरची साथ देत कितीजण ‘चला गावी’ म्हणणार याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे.