बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळापासून ऐतिहासिक घटनांवर भाष्य करणाऱ्या चित्रपट निर्मितीला प्राधान्य दिलं जात आहे. भारताच्या इतिहासामध्ये अशा काही घटना घडून गेल्या आहेत ज्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी आजच्या पिढीला ठाऊकही नाहीत. अशाच इतिहासाचा आधार घेत त्याला चित्रपट शैलीची जोड देत या कथा प्रेक्षकांसमोर सादर केल्या जातात. त्यातच आता एका चित्रपटाची भर पडली आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि करण जोहर यांच्या निर्मितीत हा चित्रपट साकारण्यात येणार आहे. सारागढीच्या युद्धावर आधारित या चित्रपटाची आपण निर्मिती करत असून, त्या चित्रपटाचं नाव ‘केसरी’ असल्याचं खिलाडी कुमारने सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.

‘धर्मा प्रॉडक्शन्स’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही याविषयीची माहिती देण्यात आली. भारतीय युद्धभूमीत लढल्या गेलेल्या युद्धांपैकी या महत्त्वाच्या युद्धाची शौर्यगाथा ‘केसरी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटात खिलाडी कुमार मुख्य भूमिकेत झळकणार असून, २०१९ मध्ये होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘केसरी’ या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सलमान खानही सहभागी असणार असल्याच्या चर्चा होत्या. पण, आता मात्र सर्व चित्र स्पष्ट झालं आहे. अभिनेता अजय देवगणसुद्धा सारागढीच्या युद्धावर आधारित चित्रपटाच्या तयारीत व्यग्र  असल्याचं म्हटलं जात होतं. पण, या चित्रपटाच्या तयारीसाठी आपल्याला बराच वेळ लागणार असल्याचं त्याने एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

आजवर सारागढीच्या युद्धाविषयी बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. भारतीय सैन्यदलाच्या इतिहासातही या युद्धाविषयी बऱ्याच चर्चा असतात. १८९७ मध्ये ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये हे युद्ध लढलं गेलं होतं. शौर्यगाथा, साहस आणि देशभक्ती यांचा मेळ साधत या युद्धपट नेमका कसा असेल याविषयीच आता चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.