कोणाचा आदर्श बनण्यासाठी किंवा नवा पायंडा पाडण्यासाठी आपण अभिनय करत नाही, असं ठाम मत अक्षय कुमार नेहमीच मांडत असतो. आपल्या मनाला पटतील त्याच भूमिका साकारणारा अक्षय कुमार त्याच्या रोजच्या आयुष्यातही याच तत्त्वावर चालण्याचा प्रयत्न करतो. एक सेलिब्रिटी असूनही तो सार्वजनिक ठिकणी सहजपणे प्रवेश करतो. चाहत्यांची गळाभेट घेतो. मुख्य म्हणजे या गोष्टी करत असताना त्याच्या स्टारडमचा कुठेच अडथळा येत नाही. अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली असून, अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यासंबंधीचा फोटो पोस्ट केला आहे.

वयाची पन्नाशी पूर्ण केलेल्या अक्षयने नुकतंच अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट दिली. आगामी ‘गोल्ड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने खिलाडी कुमार सध्या अमृतसरमध्ये असल्यामुळे त्याने या पवित्र स्थळाला भेट देण्याची संधी व्यर्थ जाऊ दिली नाही. आपल्या चित्रपटाच्या निमित्ताने सुवर्ण मंदिराला बरेच सेलिब्रिटी भेट देतात. त्यावेळी लगेचच त्यांचे फोटो माध्यमांमध्ये चर्चेत येतात. पण, अक्षयने तसं काहीच केलं नाही. तिथे येणाऱ्या लाखो भाविकांप्रमाणेच अक्षयनेही मंदिरात जात प्रार्थना केली आणि गुरुंचा आशीर्वाद घेतला. पण, यावेळी त्याच्याभोवती माध्यमांची गर्दी पाहायला मिळाली नाही. खिलाडी कुमार या ठिकाणी आल्याचं अनेकांच्या लक्षातही नव्हतं.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘अक्षयने आपल्यासाठी खास व्यवस्था केली जावी याची विचारणाही केली नव्हती. उलट चेहरा झाकत आणि डोक्यावर टोपी घालतच त्याने मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी टीममधील एकच व्यक्ती त्याच्यासोबत होती. अशा वेळी तिथे काहीही होऊ शकत होतं, चाहत्यांच्या गर्दीचा प्रचंड लोटही तिथे पाहायला मिळाला असता पण, अक्षयने तो धोकाही पत्करला’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

सुवर्ण मंदिरामध्ये भक्तांची रिघ आणि सतत सुरु असणारे काही कार्यक्रम या वेळापत्रकामध्ये आपण व्यत्यय आणणं अयोग्य ठरेल याच धारणेने त्याने मंदिर प्रशासनाकडे कोणत्याही खास सोईची विचारणा केली नाही. त्याने इतर भाविकांप्रमाणेच रांगेतून मंदिरात प्रवेश करत दर्शन घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा अक्षयने सर्वांचीच मनं जिंकली आहेत, असं म्हणायला हरकत नाही.