चित्रपटसृष्टी हे एक असं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी नेहमीच नव्या जोमाचे कलाकार उदयास येत असतात. स्वत:ची ओळख बनवू पाहात असतात. ज्येष्ठ कलाकार, नवोदित कलाकार आणि या चित्रपटसृष्टीत येऊ इच्छिणारे काही होतकरु कलाकार अशी गर्दी असणाऱ्या या कलाविश्वात काही चेहऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. असाच एक चेहरा म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बिग बींनी कोणा एका कलाकाराचं तोंड भरुन कौतुक करणं ही बाबही फार महत्त्वाची आहे. एखाद्या कलाकाराची कला आवडल्यास ते नेहमीच त्याची प्रशंसा करतात. नुकतंच त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून बंगाली अभिनेता प्रसेनजीत चॅटर्जीची प्रशंसा केली.

बच्चन यांनी ट्विट करत प्रसेनजीतच्या ‘येती ओभीजान’ या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली. त्यासोबतच ‘बंगालचा सुपरस्टार’ म्हणून त्याने प्रसेनजीतचा उल्लेख करत, त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर जरूर पाहा असं आवाहनही सर्वांना केलं. बिग बींनी प्रसेनजीतचं केलेलं कौतुक पाहता अनेकांनीच त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी युट्यूबकडे मोर्चा वळवला.

दरम्यान, श्रीजीत मुखर्जी दिग्दर्शित ‘येती ओभीजान’ या चित्रपटामध्ये प्रसेनजीतशिवाय आर्यन भौमिक, जिशू सेनगुप्ता, विद्या सिन्हा, फिर्दोस अहमद हे कलाकारही झळकणार आहेत. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिश्वर रॉहोश्यो’ या चित्रपटाचा ‘येती ओभीजान’ सिक्वल असल्याचं म्हटलं जात आहे. प्रसेनजीत चॅटर्जी हा एक प्रसिद्ध चेहरा असून, दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यांचा आकडा वाढतच आहे. त्यातही आता खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनीच प्रशंसा केल्यामुळे प्रसेनजीतकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या असणार यात शंकाच नाही.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

प्रसेनजीतच्या अभिनयाची शासन दरबारीही दखल घेण्यात आली होती. ‘दोसार’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा हा अभिनेता सध्या विविध धाटणीच्या भूमिका साकारण्याला प्राधान्य देत आहे.