प्रशासनाचे नियम आणि अटी यांपासून प्रसिद्ध चेहऱ्यांचा बचाव होत असतो असा जर का तुमचा समज असेल तर तसं नाहीये. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीला महानगरपालिकेने जबरदस्त झटका दिला आहे. मुंबईतील वर्सोवा येथील अर्शदच्या बंगल्याचा काही भागाची महानगरपालिकेने तोडफोड केली आहे.

या बंगल्यामध्ये अर्शदने एक मजला अनधिकृतरित्या बांधल्याची असल्याची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, शनिवारी एअर इंडिया को- ऑपरेटिव्ह सोसायटी (शांति निकेतन) येथील बंगला क्रमांक १० वर एक नोटीस लावण्यात आली होती. या नोटीसमध्ये अर्शद वारसीच्या नावे अवैध बांधकाम हटवण्यासाठी २४ तासांचा अवधी देण्यात आला होता. पण, अर्शदच्या वतीने पालिकेच्या या नोटीवर कोणतंच उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे त्याच्या बंगल्याच्या काही भागाची पालिका कर्मचाऱ्यांची तोडफोड केली आहे.

वाचा : टेलिव्हिजनवर ब्रम्हचर्याची शपथ घेणारा हा अभिनेता आजही अविवाहित

अर्शदने त्याच्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर १३०० चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम करुन घेतलं होतं. दरम्यान या सर्व प्रकरणी प्रतिक्रिया देत अर्शदनेही या बातमीला दुजोरा दिला. बॉलिवूडचा ‘सर्किट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया यांनी २०१२ मध्ये हा बंगला विकत घेतला होता. त्यानंतर या बंगल्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असतानाच त्यांनी अवैध बांधकाम करुन घेतलं होतं.