सलमान खानचा कोणताही चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत असतो. मग त्या चित्रपटात त्याची पाहुण्या कलाकाराची भूमिका का असेना. भाईजान सलमानचा असाच एक चित्रपट सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. चित्रपट वर्तुळात या आगामी चित्रपटाची चर्चा रंगण्यामागचं कारण म्हणजे, त्याची स्टारकास्ट. आगामी ‘रेस ३’ या चित्रपटामध्ये सलमान झळकणार असल्यामुळे सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळतंय. आता यात आणखी एका गोष्टीची भार पडली आहे.

नव्वदीच्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सुपरहिट अभिनेता बॉबी देओलसुद्धा या चित्रपटात झळकणार आहे. या भूमिकेसाठी इम्रान हाश्मीच्या नावाला प्राधान्य देण्यात येत होतं. पण, आता मात्र बॉबीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. चित्रपटाचे निर्माते रमेश तौरानी यांनी ट्विटरवरुन यासंबंधीची माहिती दिली. याआधी तौरानी आणि बॉबीने ‘सोल्जर’ आणि ‘नकाब’ या चित्रपटांच्या वेळी एकत्र काम केलं होतं. बॉबी देओलचा प्रेक्षकवर्ग पाहता त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. त्यातही सलमान, बॉबी आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस एकाच चित्रपटाटून झळकणार असल्यामुळे हा चित्रपट मनोरंजनाची मेजवानी असणार असंच म्हणावं लागेल.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

बॉबी देओलची निवड करण्याविषयी तौरानी यांनी एका वृत्तपत्राकडे त्यांचं मत मांडलं. बॉबी आपल्या कामाप्रती फार तत्पर असतो. त्याशिवाय या चित्रपटातून बॉबी कधीही न पाहिलेल्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं. नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा ‘रेस ३’चं दिग्दर्शन करणार असून २०१८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.