जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना बुधवारी संध्याकाळी लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे त्यांना मागील आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना लिलावती रुग्णालयाचे उपाध्यक्ष अजय कुमार पांडे म्हणाले, ‘हो, दिलीप कुमार आता घरी जाऊ शकतात. त्यांना डिस्चार्ज देण्यात येतोय. ते आता व्यवस्थित जेवत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा आहे. आता काळजी करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना आता घरी काही दिवस आराम करण्यास सांगितले आहे.’

वाचा : ‘या’ चित्रपटातून रामदेव बाबांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांची पत्नी सायरा बानो त्यांची काळजी घेत आहेत. दररोज सायरा त्यांच्यासोबत रुग्णालयात उपस्थित होत्या. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे लिलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टर जलील पारकर आणि किडणी स्पेशलिस्ट डॉक्टर नितीन गोखले यांच्यासोबतच इतरही काही डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. चाहत्यांपासूनच अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या होत्या.