मुंबईतील पाली हिल येथील अभिनेते दिलीप कुमार यांच्या वादग्रस्त मालमत्तेविषयीचा तिढा आता सुटला असून, सदर भूखंडावर उभ्या असलेल्या बंगल्याच्या किल्ल्या सायरा बानो यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.

२००६ मध्ये दिलीप कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा भूखंड पुनर्विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यादरम्यान दिलीपजी त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच अभिनेत्री सायरा बानो यांच्या ‘सायरा निवास’ बंगल्यात राहायला गेले. तेव्हाच त्यांचे बंधू एहसान आणि अस्लम यांनाही ती जागा रिकामी करण्यास सांगण्यात आले होते, जेणेकरुन त्याठिकाणी पुनर्विकासाच्या कामास सुरुवात करता येईल.

‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, त्या बंगल्याची जागा खटाऊ ट्रस्टची असून, ९९९ वर्षांच्या भाडेतत्वावर ती हसन चमरुद्दीन यांना सोपवण्यात आली होती. त्यांच्याकडूनच दिलीपजींनी मालमत्तेचे सर्व हक्क विकत घेतले होते. कालांतराने सर्व परिस्थिती बदलली आणि त्या मालमत्तेवर हक्क असणाऱ्या खटाऊ ट्रस्टच्या उत्तराधिकाऱ्यांनी २०१४ मध्ये ती जागा रिकामी करण्याची विचारणा करत दिलीप कुमार यांच्याविरोधात लघुवाद न्यायालयात खटला दाखल केला होता.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

तेव्हापासूनच या मालमत्तेविषयी तेढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. पण, आता मात्र दिलीप कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांनी या सर्व प्रकरणात सुटकेचा नि:श्वास सोडला असून, पुन्हा या भूखंडावर ताबा मिळण्याचा आनंद व्यक्त केला आहे. सायरा बानो यांनीही माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणात आपली साथ देण्याबद्दल सर्वोच्च न्यायालय, प्रसारमाध्यमं आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘मला या निर्णयामुळे फारच आनंद होतोय. सर्वोच्च न्यायालयाने दिलीप कुमार यांच्या बाजूने दिलेल्या निर्णयाबद्दल मी त्यांची आभारी आहे’, असे सायरा बानो माध्यमांसमोर म्हणाल्या.