अतिसंवेदनशील आणि काही प्रमाणात वादग्रस्त विषयांवर लेखन करणाऱ्या सादत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नंदिता दास या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटामध्ये मंटो यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सध्या सुरु असणाऱ्या ७० व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या बहुचर्चित चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं आहे.

रुपेरी पडद्यावर मंटो यांची व्यक्तिरेखा ताकदीने साकारण्यासाठी नवाजने बरीच मेहनत घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेला फोटो पाहता यामध्ये सादत यांच्या लेखणीतून झळकणारे बरेच भाव पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच पोस्टरवरील उर्दू कॅलिग्राफी त्याला आणखीनच वास्तवदर्शी बनवत आहे. नेहमीच्या लिखाणाच्या जीर्ण वहीतील पानाप्रमाणे असलेल्या पोस्टरवर एक ओरखडाही आहे.

पोस्टरवरील हा ओरखडा मंटोंच्या लेखनशैलीला असलेल्या विरोधाची अुनभूती करुन देत आहे. ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या पोस्टरसोबत लिहिण्यात आलेल्या ओळीही त्या पोस्टरला साजेशा आहेत. या चित्रपटाचं एकंदर कथानक पाहता मंटो म्हणजे काय हे अनेकांपर्यंत पोहोचणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री रसिका दुग्गल नवाजसोबत स्क्रीन शेअर करणार असून, ती मंटो यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटामध्ये १९४० चा काळ साकारण्यात येणार आहे. त्यामुळे ‘मंटो’ खऱ्या अर्थाने नंदिता आणि नवाजसाठी एक खास चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाचं एकंदर कथानक पाहता बरेच पट्टीचे कलाकार ‘मंटो’मध्ये झळकणार आहेत. त्यामुळे नंदिताच्या या चित्रपटाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले आहे.

‘मंटो’शिवाय नवाज येत्या काळात ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटामध्ये कॉन्ट्रॅक्ट किलरच्या भूमिकेतही झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता ताहिर राज भसिनसुद्धा झळकणार असून, या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री चित्रांगदा सिंग बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

18557482_1197443160366310_8701858700080731045_n

18595612_1197443157032977_7341239601002254675_o

18620385_1197443153699644_5395234031866389643_n

18622338_1197443257032967_2196877769290709844_n