अभिनय क्षेत्रासोबतच राजकारण आणि देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य करत नेहमीच सर्वांचं लक्ष वेधणारे एक दिग्गज अभिनेत म्हणजे परेश रावल. एक सहायक अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या परेश रावल यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, त्यासोबतच ठामपणे आपली मतं मांडत ते नेहमीच चर्चेत राहिले. एक प्रतिष्ठित अभिनेता आणि भाजपच्या खासदार पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या परेश रावल यांनी कधीच कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर परखडपणे आपली मतं मांडली आहेत. त्यांचे ट्विट, प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखती आणि संसदेच्या व्यवहारावर केलेली टीका नेहमीच चर्चेत राहिली. आज त्यांच्या वाढदिवसा दिवशी आपण या अभिनेत्याच्या काही अशाच विधानांवर पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत.

सध्या परेशजी चर्चेत आहेत ते म्हणजे अरुंधती रॉय यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे. लष्कराच्या जीपसमोर दगडफेक करणाऱ्या व्यक्तीऐवजी अरुंधती रॉय यांना बांधायला हवे होते, असे ट्विट परेश रावल यांनी केले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ‘दगडफेक करणाऱ्या व्यक्तीऐवजी अरुंधती रॉय यांना लष्कराच्या जीपसमोर बांधायला हवे होते,’ असे ट्विट परेश रावल केलं होतं. मुख्य म्हणजे ट्विटरच्या दबावामुळेच हे ट्विट डिलीट केल्याचं म्हटलं जात आहे.

संसदेत गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर उपहासात्मक टीका केल्यामुळेही परेश रावल चर्चेत आले होते. सरकारने देशातील काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी ५००-१००० रूपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळे रोख रकमेच्या स्वरूपात काळे धन बाळगणाऱ्यांची चांगलीच गोची झाली. याच धर्तीवर काही खासदारांकडून सभागृहातील अध्यक्षांच्या आसनासमोरच्या जागेत (वेल) येऊन गोंधळही घालण्यात आला होता. परेश रावल यांनी नेमका हाच धागा पकडत नोटांबदीच्या मुद्द्यावरून संसदेचे कामकाज रोखून धरणाऱ्या विरोधकांना लक्ष्य केलं. ‘ज्यांचे पैसे ‘वेल’मध्ये आहेत, तेच संसदेच्या ‘वेल’मध्ये येत आहेत. यावरून तुम्ही काय ते समजून घ्या’, असं रावल यांनी म्हणाले होते.

paresh-rawal-759

सेक्स स्कँडलमुळे आपलं मंत्रीपद गमवावे लागलेल्या आम आदमी पक्षाचे (आप) माजी सदस्य संदीप कुमार यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली होती. त्यादरम्यानच बऱ्याच विरोधी पक्षांनी आपवर हल्लाबोल केला होता. त्यातच परेश रावल यांनीही आपलं मत मांडलं होतं, त्यांनी आपचा उल्लेख पाप असा करत ‘बोटी के बदले राशन’ ही सरकार चालवण्याची नवी पद्धत असल्याचं म्हटलं होतं. ‘पाप पार्टी पेश करती है…नया तरीका शासन का..बोटी के बदले राशन का’ असे ट्विट परेश रावल यांनी केलं होतं. संदीप कुमार यांनी रेशन कार्ड देतो असे सांगून अंमली पदार्थ देऊन आपले शारीरिक शोषण केले होते, असा आरोप त्या आक्षेपार्ह सीडीतील महिलेने केला होता.

वाचा: बांधिलकीची गोष्ट

प्रसारमाध्यमांशी बोलतानाही रावल यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याचा आणि हजरजबाबीपणाचा नेहमीच प्रत्यय दिल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी महिलेने केलेल्या आरोपाला विनोद बुद्धीने फिल्मी शैलीत प्रत्त्युत्तर दिले. ‘मॅडम कपाळावर येणारे केस बाजूला करुन पाहा’ म्हणजे बातमीतील सत्य कळेल असे रावल यांनी म्हटले होते. परेश रावल यांनी केलेल्या एका ट्विटवर पर्मिला नावाच्या महिलेने आक्षेप नोंदविला होता. परेश रावल यांनी दिव्यांग सैनिकांच्या पेन्शन संदर्भात ट्विट करत दिव्यांग सैनिकांची पेन्शन कमी करावी, या वृत्ताचं खंडन केलं होतं. दिव्यांग सैनिकांच्या पेन्शनच्या मुद्यावरुन महिलेने मारलेल्या टोमण्याला परेश रावल यांनी फिल्मी शैलीत उत्तर दिले. मॅडम आपल्या कपाळावरील केस बाजूला करुन पाहा, असे म्हटले. आपल्या ट्विटची सत्यता दाखवून देण्यासाठी त्यांनी सरकारने लष्कराच्या वेतनसंदर्भात घेतलेल्या निर्णयाची लिंक देखील ट्विटरवरुन शेअर केली.

pareshrawal759

शैक्षणिक क्षेत्रातील खासगी शिकवण्यांच्या भूमिकेवर रावल यांनी केलेली मिष्किल टिप्पणीही अनेकांचं लक्ष वेधून गेली होती. सध्याच्या काळात खासगी शिकवण्यांचं क्षेत्र हे संघटित झालं आहे. या संस्थांची सरकारी शाळा आणि महाविद्यालयांतील शिक्षकांशी अभद्र युती असून स्पर्धात्मक परीक्षांवरदेखील या संस्था प्रभाव पाडत असल्याचं परेश रावल यांनी म्हटलं होतं. सरकारी शाळांमधील शिक्षकच या क्लासेसमध्ये शिकवतात. खासगी शिकवण्यांचे हे वाढते प्रस्थ शैक्षणिक दहशतवादासारखे आहे. दहशतवाद्यांप्रमाणेच सरकारकडे या खासगी शिकवण्यांची कोणतीही माहिती नाही. कोणतेही नियंत्रण किंवा परवान्याशिवाय या शिकवण्या सुरू असल्याचं परेश रावल यांनी सांगितलं होतं.