‘रॉकस्टार’ रणबीर कपूरचं नाव एखाद्या अभिनेत्रीच्या नावाशी जोडले जाणे ही नवीन बाब नाही. उलट त्याच्या गर्लफ्रेंड्सविषयी जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्येही असते. पण पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत त्याचे नाव जोडणे अनेकांना रुचलेले नाही. काहींनी नाराजीचा सूर आळवला आहे. त्यातही न्यूयॉर्कमध्ये धुम्रपान करतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नेटिझन्सनी थेट माहिराच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे आता अनेक सेलिब्रिटी तिची पाठराखण करू लागले आहेत. त्यात रणबीरही आहे.

‘गेल्या काही महिन्यांत मी माहिराला अगदी चांगले ओळखू लागलो आहे. तिच्याविषयी माझे चांगले मत असून, मी तिचा आदर करतो. एक व्यक्ती म्हणून आणि तिने मिळवलेल्या यशाबद्दलही मला तिचा आदर वाटतो. सध्याच्या घडीला तिच्याविषयी केली जाणारी वक्तव्ये साफ चुकीची आहेत. एक महिला आणि म्हणून ज्या भेदभावाच्या उद्देशाने तिची पारख केली जात आहे, ते चुकीचे आहे. मी सर्वांनाच विनंती करतो की, तिच्याविषयीच्या या नकारात्मक चर्चा थांबवाव्यात आणि प्रत्येकाने आपापल्या आयुष्याकडे जास्त लक्ष द्यावे, असे तो म्हणाल्याचे वृत्तं ‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केले आहे.

वाचा : माझा मुलगा कोणत्याही मुलीला भेटू शकतो- ऋषी कपूर

सोशल मीडियावर माहिराविषयी होणाऱ्या उलटसुलट चर्चांना रणबीरने थेट उत्तर दिले आहे. धूम्रपान आणि एखाद्याचा द्वेष करणे या दोन्ही गोष्टी शरिरासाठी हानिकारक असतात, असे तो म्हणाला. रणबीर सध्या संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी जास्त वेळ देत आहे. त्याच्याच चित्रिकरणादरम्यान माहिरा आणि रणबीरची भेट झाली असून, त्यांनी एकमेकांबरोबर काही क्षण व्यतीत केले असल्याची चर्चा आहे. रणबीर आणि माहिरा यांच्या भेटीमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या या भेटीनंतर अनेक तर्क लढवले जात आहेत. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे.