बॉलिवूडमध्ये कलाकार मंडळींमध्ये होणारे ब्रेकअप, पॅचअप आणि लिंकअप ही काही नवी गोष्ट नाही. पण, त्यात काही कलाकार जोड्या अशा आहेत ज्यांचं वेगळं होण चाहत्यांच्या मनालाही चटका लावून जातं. अशीच एक जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. ‘गोलियों की रासलीला राम लीला’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटापासूनच त्यांची जवळीक वाढली आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं.

‘राम लीला’नंतर बी- टाऊनचं हे मोस्ट हॅपनिंग कपल ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातही झळकलं. इथेसुद्धा त्यांच्या अफलातून केमिस्ट्रीने अनेकांची मनं जिंकली. त्यांच्या नात्यातही सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण, काही दिवसांपूर्वीच करिअर आणि कमिटमेंटच्या मुद्द्यावरुन रणवीर- दीपिकाच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात होतं. इतकच नव्हे तर, रणवीरने दुसऱ्या एका मुलीला डेट करण्यास सुरुवात केल्याचंही म्हटलं जाऊ लागलं. आपल्या आवडत्या सेलब्रिटी कपलच्या नात्यात अशा प्रकारे एकाएकी दुरावा आल्यामुळे चाहत्यांमध्येही निराशा पाहायला मिळाली. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ आणि लॅक्मे फॅशनवीकनंतर या दोघांचं कारमध्ये एकत्र दिसणं या सर्व चर्चांना पूर्ण विराम देत आहे.

https://www.instagram.com/p/BYEm0JinkBj/

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

https://www.instagram.com/p/BYExukMHzhR/

सोशल मीडियावर बऱ्याचजणांनी शेअर केलेल्या काही व्हिडिओमध्ये जगाचं भान विसरुन रणवीर- दीपिका एकमेकांमध्येच हरवले असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये ते एकमेकांशी काहीतरी बोलत असून, सध्याच्या घडीला मिळालेल्या सुरेख क्षणांचा आनंद घेताना दिसतात. मुख्य म्हणजे आपल्या भोवती असणारी गर्दी, माध्यमांचे कॅमेरे या साऱ्याची पर्वा न करता हे दोघंही एका वेगळ्यात दुनियेत, सर्वांपासून अलिप्त असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला नाहीये हे आता स्पष्ट झालं आहे. येत्या काळात ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज होत असून, ‘पद्मावती’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांच्या वेगळ्या भूमिका पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.