सोशल मीडियावर व्हायरल झालेली कोणतीही गोष्टी नेटिझन्स इतक्या सहजासहजी विसरत नाहीत. सध्या अशाच एका गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ती चर्चा आहे ‘चॉकलेट बॉय’ रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्या व्हायरल झालेल्या काही फोटोंची. रणबीर आणि माहिराचे फोटो पाहता हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचे तर्क लावले जात आहेत. अनेकांसाठी तर त्यांचे हे फोटो एक धक्कादायक बाब ठरली. पण, रणबीरचे बाबा ऋषी कपूर मात्र या सर्व गोष्टींवर फारसे व्यक्त झाले नाहीत. ट्विटरवर नेहमीच टिवटिव करणारे ऋषी कपूर यांनीसुद्धा हे फोटो सोशल मीडियावर पाहिले तेव्हाच हे प्रकरण त्यांच्या लक्षात आलं. पण, यावर ते थक्क वगैरे झाले नाहीत.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रणबीरच्या या फोटोंबद्दल विचारलं असता ऋषी म्हणाले, ‘मी सकाळीच हे फोटो पाहिले. माझा त्या फोटोंशी काहीच संबंध नाही त्यामुळे मला या प्रकरणापासून दूरच ठेवा. मीसुद्धा ट्विटरवरच हे फोटो पाहिले. कारण इन्स्टाग्राम, फेसबुकचा मी वापर करत नाही. त्याबद्दल मला आधीपासूनच माहित होतं असंही नाही. रणबीर तरुण आहे, अविवाहित आहे, सिंगल आहे. तो कोणालाही भेटू शकतो. पण, त्याच्या खासगी आयुष्याविषयी अशा प्रकारच्या चर्चा रंगणं हे चुकीचं आहे. मी या फोटोंबद्दल काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. तो तरुण आहे, तो कोणत्याही मुलीला भेटू शकतो.’

रणबीर आणि माहिरा या फोटोंमध्ये धुम्रपान करत असताना दिसत असल्याविषयी विचारलं असता ऋषी कपूर यांनी सारवासारव करत, फोटो पाहून उगाच काहीही तर्क लावणं चुकीचं आहे असंही स्पष्ट केलं. अमेरिकेत बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी आहे. असं म्हणत त्यांनी विषय वळवण्याचा प्रयत्न केला. ‘मी या गोष्टीबद्दल फार काही बोलू शकत नाही. कारण, मला त्याबद्दल काहीच माहीत नाही’, असंही ते म्हणाले. सोबतच या सर्व अफवा असल्याचंही स्पष्ट केलं.

माहिरा खान आणि रणबीरच्या फोटोंची चर्चा रंगत असून, तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे आणि ती धुम्रपान करत असल्यामुळे अनेकांनी आगपाखड केल्याचंही पाहायला मिळालं. पण, यामध्ये कुठेतरी मर्यादा ओलांडली जात असल्याचं लक्षात येताच अभिनेता अली जफरने ट्विटरवर एक खुलं पत्र लिहित त्यातून आपले विचार मांडत माहिराला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

‘आपल्याला काय झालं आहे? आपल्यातील संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे. प्रत्येक महिलेल्या काही गोष्टी निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकार आहे. या गोष्टींवर आपण ज्या प्रकारे व्यक्त होत आहोत. त्यातून तुमच्या व्यक्तीमत्त्वाचं दर्शन घडत आहे.’, असं म्हणत अलीने सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या या चर्चांचा विरोध केला आहे. त्यासोबतच कोणाच्या कपड्यांवरुन, वागण्याबोलण्यावरुन तर्क लावणं ही बाबही चुकीचं असल्याचं त्याने या पत्रातून स्पष्ट केलं. अलीने दिलेला पाठिंबा, ऋषी कपूर यांनी केलेली सारवासारव या सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरीही अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे रणबीर आणि माहिराच्या नात्यामागचं सत्य जाणून घेण्याची.