सोशल मीडियावर नेटिझन्सच्या नजरेत कधी कोणती गोष्ट येईल याचा काहीच नेम नाही. असाच काहीसा अनुभव अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंग यांना येत असावा. कारण, सध्या चर्चा होतेय ती म्हणजे त्यांच्या लग्नाच्या एका फोटोची.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही फोटोंच्या यादीत सध्याच्या घडीला सैफ- अमृताच्या वेडिंग फोटोशूटच्या दरम्यानचा एक फोटो अनेकांचच लक्ष वेधत आहे. या फोटोमध्ये अमृता नववधूप्रमाणे नटली असून, लग्नाचा आनंद तिचं सौंदर्य आणखीनच खुलवत आहे. तर सैफही शेरवानीमध्ये नवाबापेक्षा कमी दिसत नाहीये. या दोघांच्या शाही जोड्याची झलक टिपलेल्या या फोटोचं त्यांच्या लेखी काहीच महत्त्व राहिलेलं नसावं. कारण, त्यांच्या नात्याला तडा जाऊन आता बरीच वर्षे उलटली आहेत. मुख्य म्हणजे दोघंही आपल्या आयुष्यात सुखी आहेत. असं असलं तरीही नेटिझन्सनी मात्र या फोटोवरुन वेगळ्याच चर्चा रंगवण्यास सुरुवात केली आहे. इतके दिवस कोणाचंही लक्ष न गेलेली अमृताच्या नाकातील रिंग सध्या चर्चेचा विषय ठरतेय.

तिच्या नाकात असलेली ती रिंग म्हणजे सैफचं कडं आहे, असं एका ट्विटर युजरने म्हटलंय. तर, ती एक बांगडी असल्याचंही ट्विटरवर म्हटलं जात आहे. काहींनी तर त्यांच्या लग्नाच्या या फोटोवर ‘पहरेदार पिया की’ या मालिकेचा संदर्भ देत मालिकेचं कथानक यांच्याच खऱ्याखुऱ्या आयुष्यावर आधारित असल्याचं ट्विट केलं आहे. ‘पहरेदार पिया की’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून कथानकामुळे चर्चेत आहे. १८ वर्षांच्या मुलीचं नऊ वर्षांच्या मुलाशी लग्न लावण्याची प्रथा दाखवल्यामुळे या मालिकेवर अनेकांनीच नाराजी व्यक्त केली आहे. सैफ आणि अमृताच्या लग्नाच्या फोटोशी या मालिकेचा संबंध जोडण्यामागचं कारण की, त्यांच्या वयातही बरंच अंतर आहे. सैफ, अमृतापेक्षा वयाने जवळपास १२ वर्षांनी लहान आहे. त्यामुळेच त्यांच्या जोडीला ‘पहरेदार पिया की’ असं म्हटलं जातंय.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?