बॉलिवूडमध्ये आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सलमान खानचं नाव अग्रस्थानी येतं. अभिनयासोबतच सलमानने गायन, चित्रपट निर्मिती आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत सलमान चांगलाच यशस्वी झाला आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करणाऱ्या या ‘दबंग’ खानच्या मानधनाविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये नेहमीच कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळतं. त्यातही यंदाच्या पर्वात त्याच्या मानधनाचा आकडा मोठ्या अंतराने वाढला असल्याचंही म्हटलं जात आहे. तो आकडा किती अंतराने वाढला आहे, याविषयीच आता अनेकजण तर्क लावत आहेत.

प्रेक्षकांची उत्सुकता फारशी न ताणता ‘बॉलिवूड हंगामा’ने सलमानच्या मानधनावरुन पडदा उचलला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वाचं सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान खानला प्रत्येक भागासाठी ११ कोटी रुपयांचं घसघशीत मानधन मिळणार आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी मिळणारे हे आतापर्यंतचं सर्वाधिक मानधन ठरत आहे.

टेलिव्हिजन विश्वातील या वादग्रस्त कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वापासून ते सहाव्या पर्यापर्यंत सलमानने सूत्रसंचालनासाठी प्रत्येक भागाच्या चित्रीकरण्यासाठी अडीच कोटी रुपये इतकं मानधन घेतलं होतं. पण, त्यानंतर मात्र त्याने मानधनाचा आकडा वाढवला. हा आकडा वाढत वाढत ८ कोटींच्या घरात पोहोचला होता. अशी माहिती सूत्रांनी दिली.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण…

कार्यक्रमाची लोकप्रियता आणि इतर सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच भाईजान सलमानने त्याच्या मानधनात इतकी वाढ केली असल्याचं म्हटलं जात आहे. ‘बिग बॉस’च्या घरात येणाऱ्या पाहुण्यांना धारेवर धरत वेळ पडल्यास त्यांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी मदत करणारा सलमान या कार्यक्रमाचा ‘यूएसपी’ आहे असं म्हणायला हरकत नाही.