बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या मुलाखतींमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेकजण त्याच्या मुलाखती आवर्जून पाहतात. विविध विषयांवर आपला दृष्टीकोन मांडणाऱ्या शाहरुखने नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यामध्ये एक ‘सेलिब्रिटी’ म्हणून इतर गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन नेमका कसा आहे, हे त्याने स्पष्ट केलं. यावेळी त्याने म्हटले की, ‘मी समकालीन कलाकारांचे अनुकरण करत राहिलो आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेत राहिलो तर माझ्या लोकप्रियतेचा काय उपयोग, या साऱ्याचा काय अर्थ…’

चित्रपटसृष्टीत २५ वर्षांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरुखचा अनेकांनाच हेवा वाटतो. शून्यातून सुरुवात करून तो आज हिंदी चित्रपटसृष्टीच्या शिखरावर विराजमान झाला आहे. साहजिकच त्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. परंतु, शाहरूख स्वत: कोणाला प्रेरणास्थानी मानतो, कोणाचं अनुकरण करतो, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. अशाच अनेक प्रश्नांना शाहरूखने मुलाखतीत दिलखुलासपणे उत्तरे दिली. ‘जर तुम्हाला इतरांचेच अनुकरण करायचे आहे, इतर मंडळी काय करत आहेत याचीच चिंता करायची आहे किंवा सतत दुसऱ्या व्यक्तींच्या कामगिरीविषयी विचार करायचा असेल, त्यांच्याशी स्वत:ची तुलना करायची असेल, तर एक मोठा कलाकार असण्याचा उपयोग काय?’, असे मत त्याने यावेळी मांडले.

वाचा : अंमली पदार्थाचा अल्पवयीन मुलांना विळखा

‘प्रत्येक गोष्ट मला हवी तशीच घडते आहे, हे मी गर्वाने सांगत नाही. पण, अशी बरीच मंडळी आहेत ज्यांना शाहरुख खानसारखे व्हायचे आहे. मी स्वत:च शाहरुख आहे, त्यामुळे इतरांप्रमाणे होण्याची इच्छा मी का बाळगावी?, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. शाहरुखने या मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणीही सांगितल्या. चित्रपटसृष्टीत येण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपण या शहरात आलो होतो तेव्हा हाताशी काहीच नव्हते. मनाला जे पटले ते आपण करत गेलो आणि आज या टप्प्यावर पोहोचलो, असे त्याने सांगितले. मुख्य म्हणजे त्यावेळी आपल्याकडे गमावण्यासाठी काहीच गोष्टी नव्हत्या. पण आज माझ्याकडे सर्वकाही आहे. त्यामुळे आपण मनापासून एखादी गोष्ट केली तरच आपल्याला आनंद मिळतो, असे यावेळी शाहरूखने सांगितले.