गेल्या काही दिवसांपासून शाहरुखची सर्वात मोठी चाहती म्हणून सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलेल्या अरुणा पीके यांनी जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

अरुणा कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराने ग्रासलेल्या असूनही सतत हसतमुख असायच्या. बॉलिवूड किंग शाहरुख खानवरील त्यांचे प्रेम पाहून अनेकजण त्यांना ‘जबरा फॅन’ म्हणायचे. आपल्या शेवटच्या दिवसांत त्यांनी शाहरुखची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांची ही इच्छा किंग खानपर्यंत पोहोचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आणि या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही आले होते.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

#SRKMeetsAruna हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला होता. ज्यामुळे शाहरुखने अरुणा यांच्यासाठी त्याच्या एका फॅनपेजवरुन व्हिडिओ पोस्ट करत अरुणा यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची प्रार्थना केली होती. ‘तुम्ही कर्करोगाशी झुंज देत असल्याचे मला तुमचा मुलगा आणि मुलगी यांच्याकडून समजले. माझ्या मित्रपरिवारासह सर्वांनाच तुमच्याबद्दल माहिती आहे. मी लवकरच तुमची भेट घेईन. तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना देतो’, असे शाहरुख त्या व्हिडिओमध्ये म्हणाला होता. अरुणा यांच्या निधनानंतर किंग खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.