अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत-कपूर ही जोडी सध्या अनेकांच्याच आवडीची आहे. मीरासोबत विवाहबंधनात अडकल्यापासूनच शाहिद ‘परफेक्ट फॅमिली मॅन’ झाला आहे. विविध कार्यक्रमांना मीरा आणि शाहिद एकमेकांसोबत एकत्र जाण्यापासून ते अगदी रेड कार्पेटवरील या दोघांचाही वावर या साऱ्यावर अनेकांच्याच नजरा खिळललेल्या असतात. चाहत्यांसोबतच छायाचित्रकार आणि प्रसारमाध्यमांमध्येही या जोडीच्या बऱ्याच चर्चा रंगतात. अशा या सर्वाधिक लोकप्रिय जोडीला नुकताच ‘स्टायलिश कपल’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ‘हॅलो! हॉल ऑफ फेम अवॉर्ड्स २०१७’च्या दिमाखदार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लग्नापूर्वी मीराचे हिंदी चित्रपट सृष्टीसोबत कोणतेही नाते नव्हते. असे असतानाही एका सेलिब्रिटीची पत्नी, त्यामुळे वाट्याला आलेली प्रसिद्धी आणि आता एक आई अशा बऱ्याच जबाबदाऱ्या मीराने लिलया पेलल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान मीराची प्रकट मुलाखत घेण्यात आली. ज्यामध्ये तिने कामावर न जाता घरी राहून आपल्या पाल्यांच्या संगोपनासाठी वेळ देणाऱ्या वर्गातील महिलांचे समर्थन केले. त्यानंतर नोकरदार वर्गातील अनेकांनीच मीराविषयी नाराजीचा सूर आळवत तिच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले. ही सर्व परिस्थिती पाहत शाहिदने मीराची बाजू सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शाहिद आणि मीरा प्रत्येक सुख, दुःखाच्या क्षणी एकमेकांची साथ देतात हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. शाहिद-मीरा बॉलिवूडचे ‘स्टायलिश कपल’ ठरल्यावर सोशल मीडियावरुनही या जोडीचे कौतुक करण्यात आले.

unnamed-112

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्याच्या वेळी शाहिद आणि मीरा रेड कार्पेटवर येताच सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. यावेळी शाहिद्ने घातलेला काळ्या रंगाचा सूट आणि मीराचा पायघोळ गाऊन अनेकांची पसंती मिळवून गेला. या पुरस्कार सोहळ्याला विविध बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती. आलिया भट्ट, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, रेखा आणि इतरही बी-टाऊन सेलिब्रिटींची या पुरस्कार सोहळ्यात उपस्थिती पाहायला मिळाली. ‘हॅलो! हॉल ऑफ फेम’ या पुरस्कार सोहळ्यामध्ये ट्विंकल खन्नाला ‘वुमन ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर, ‘उडता पंजाब’, ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातून दर्जेदार अभिनय सादर करणाऱ्या आलिया भट्टला ‘आऊटस्टॅण्डिंग टॅलेंट’ हा पुरस्कार देण्यात आला.