वडील-मुलीच्या नात्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. मुलांपेक्षा मुलीच वडिलांच्या जास्त जवळ असतात हे अगदी खरंच आहे, असं अभिनेता शाहिद कपूर आणि मिशाकडे पाहताना लक्षात येत आहे. बॉलिवूडमधील वडील-मुलीची ही जोडी सध्या अनेकांचीच मनं जिंकत आहे. शाहिदने काही दिवसांपूर्वीच मिशासोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करत त्याला सुरेख असं कॅप्शनही दिलं होतं. बी- टाऊनच्या या अभिनेत्याने पुन्हा एकदा मिशाला त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सर्वांच्या भेटीला आणलं आहे.

‘वर्ल्ड डान्स डे’च्या निमित्ताने शाहिदने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मुळातच पट्टीचा डान्सर असणारा शाहिद आपल्याला थिरकताना दिसतो. पण, इथे तो एकटा थिरकत नाहीये तर सुपरक्युट डान्सिंग पार्टनर, मिशासुद्धा त्याला साथ देतेय. शाहिद जसजसा थिरकतोय तसतशीच चिमुरडी मिशाही निरागसपणे आपल्या बाबांना फॉलो करताना दिसत आहे. मिशा आणि शाहिदची ही डान्सिंग केमिस्ट्री पाहता शाहिदसोबत आतापर्यंत व्यासपीठावर नृत्य सादर केलेल्या अभिनेत्रींनाही हा परफॉर्मन्स मागे टाकत आहे.

मिशाच्या जन्मानंतर बराच काळ शाहिदने तिला प्रसारमाध्यमांपासून आणि सोशल मीडियापासून दूर ठेवलं होतं. पण, आता मात्र तो स्वत:च मिशासोबतचे काही खास क्षण सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. चित्रपट आणि इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असणारा शाहिद त्याच्या कामासोबतच कुटुंबालाही तितकंच महत्त्व देतो हेसुद्धा तितकच खरं. मोकळा वेळ असेल तेव्हा तो पत्नी मीरा आणि मुलगी मिशासह वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देतो, त्यामुळे तो खऱ्या अर्थाने ‘परफेक्ट फॅमिली मॅन’ ठरत आहे.

मिशा आणि मीराला नेहमीच प्राधान्य देणारा शाहिद लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहिदसोबतच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंगही झळकणार आहेत. ‘पद्मावती’मध्ये शाहिद मेवाडच्या राजाची भूमिका साकारणार आहे.