बॉलिवूडमध्ये एकदा नावारुपास आल्यानंतर सेलिब्रिटी बऱ्याच कार्यक्रमांना, पार्ट्यांना हजेरी लावतात. पण, काही कलाकार मंडळी मात्र नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जात स्वत:चं वेगळेपण जपतात. अशाच सेलिब्रिटींच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता सनी देओल. अवाजवी बोलणं, खोटी प्रशंसा आणि स्वत:ला इतरांनी महत्त्वं द्यावं यासाठी सतत कोणाच्यातरी मागे फिरणाऱ्यांपैकी आपण नाही असं सनीने नुकतच एका मुलाखतीत स्पष्ट केलं.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चित्रपटसृष्टीतील आपल्या एकंदर प्रवासाविषयी सांगताना सनी म्हणाला, “मला अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा सेलिब्रिटी पार्टीसाठी मला बोलवलं जायचं आणि मी तिथे कधीच जात नसे. तेव्हा काहीजणांनी तर ‘मी स्वत:ला कोण समजतो?’, ‘हा आहे तरी कोण?’ असेही प्रश्न उपस्थित केले होते. पण, कालांतराने परिस्थिती बदलली आणि मी असाच आहे हे इतरांच्याही लक्षात आलं.”

‘फिल्मी किंवा इतर कोणतीही पार्टी असो. सगळ्या ठिकाणचा माहोल एकसारखाच असतो. दारू, गॉसिप आणि सगळ काही तेच’, असं सनी म्हणाला. त्याच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दर दिवसाआड चित्रपटसृष्टीमध्ये बहुविध कारणांनी पार्टीचं आयोजन केलं जातं. कधी सेलिब्रिटींच्या घरी, कधी पंचतारांकित हॉटेल तर कधी परदेशात या पार्टीचा रंग चढतो. पण, सनी मात्र या साऱ्यापासून स्वत:ला फारच लांब ठेवतो हेच खरं.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

पार्टीमध्ये न जाण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट करताना तो म्हणाला, ‘लहानपणापासूनच मी लाजरा आहे. आजही मी चित्रपटसृष्टीतील फार कमी कार्यक्रमांना हजेरी लावतो.’ पार्टी किंवा दिमाखदार सोहळ्यांमध्ये फारसा रस नसलेला सनी व्यायाम करण्यात, लाँग ड्राईव्हवर जाण्यात किंवा मग गाणी ऐकण्यात त्याचं मन रमवतो. याच स्वभावामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे तो आजही अनेकांचाच आवडता अभिनेता असून, तरुणांमध्ये तर सनीच्या फिटनेसच्याही बऱ्याच चर्चा पाहायला मिळतात.