‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हटलं की काही कलाकरांचं नाव लगेचच अनेकांच्या तोंडी येतं. या करालाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता वरुण धवन. ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वरुण धवनच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्या फिमेल फॅन फॉलोइंगविषयी तर वेगळं काही सांगण्याची गरजच नाहीये. पण, अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला वरुण बऱ्याच वर्षांपासून नताशा दलालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

विविध कार्यक्रमांना, बी- टाऊन पार्ट्यांनाही नताशा वरुणसोबत हजेरी लावते. त्यामुळे त्यांचं नातं आता कोणापासूनही लपलेलं नाहीये. माध्यमांच्या नजरेतूनही वरुण आणि त्याची ही प्रेयसी काही चुकलेली नाही. पण, छायाचित्रकार जेव्हा जेव्हा नताशा आणि वरुणचे फोटो घेण्यासाठी पुढे येतात तेव्हा तेव्हा तो तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो. प्रसारमाध्यमांपासून तिला तो नेहमीच दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. याविषयी खुद्द वरुणनेच #NoFilterNeha या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात खुलासा केला.

तुला कोणी परफेक्ट गर्लफ्रेंड मिळाली आहे का, असा प्रश्न वरुणला विचारला असता तो म्हणाला, ‘हो. किंबहुना मी रिलेशनशिपमध्ये असल्याचं कधीही लपवलं नाहीये. मी फक्त त्याविषयी उघडपणे काहीही बोललो नाहीये. कारण, माध्यमांमध्ये माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थही काढला जाऊ शकतो. त्यातही या चित्रपटसृष्टीशी तिचा काहीच संबंध नसल्यामुळे तिला मी माध्यमांपासून दूरच ठेवतो. मी माझं खासगी आयुष्य माध्यमांपासून दूर ठेवणं पसंत करतो.’

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

त्यानंतर लगेचच त्याला लग्नाविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत वरुण म्हणाला, ‘आम्ही इतक्या पुढचा विचार केला नाहीये. कधीकधी अशी कोणी एक व्यक्ती जेव्हा तुम्हाला भेटते तेव्हा आयुष्याबद्दल ज्या काही गोष्टी ठरवलेल्या असतात त्या कुठेतरी बाजूला सरतात.’ वरुण आणि नताशाच्या या नात्याविषयी सध्या बरेच अंदाज बांधण्यात येत आहेत. तेव्हा खुद्द वरुणनेच त्याच्या खासगी आयुष्याविषयीचे काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत असंच म्हणावं लागेल.