वरुण धवन, तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर ‘जुडवा २’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ या चित्रपटाचा रिमेक असलेला ‘जुडवा २’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत असून या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबतची माहिती दिली. अनेकांना या बातमीमुळे धक्काच बसला कारण, ‘जुडवा २’ला इतकं यश मिळेल अशी अपेक्षाच अनेकांनी केली नव्हती.

बॉलिवूडचं दुसरं नाव म्हणजे अनिश्चितता असं म्हणतात ते उगाच नाही. कारण, इथे कधी कोणता चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेतली, याचा अंदाजही लावता येत नाही. बऱ्याचदा काही चित्रपटांना घवघवीत यश मिळणार अशी अपेक्षा असतानाच ते चित्रपट पहिल्याच आठवड्यात आपला गाशा गुंडाळतात. पण, काही चित्रपट मात्र अनपेक्षित यश मिळवत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. २०१७ हे वर्ष बॉलिवूडच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. कारण, शाहरुख खानचा ‘रईस’ आणि खिलाडी कुमारचा ‘टॉयलेट – एक प्रेम कथा’ या चित्रपटांमागोमाग आंतरराष्ट्रीय पातळीवर २०० कोटींच्या कमाईचा आकडा पार करणारा ‘जुडवा २’ हा तिसरा हिंदी चित्रपट ठरला आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

२९ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी नव्या अंदाजात ‘जुडवा’चं कथानक सादर केलं होतं. प्रत्यक्षात दोन्ही चित्रपटांमध्ये बरंच वेगळेपण जाणवतं. नव्वदच्या दशकात आलेल्या ‘जुडवा’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही डेव्हिड धवन यांनीच केलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या रिमेकमधून नेमक्या कोणत्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, हे त्यांनी अचूकपणे हेरत त्यावर काम केलं होतं.

सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतही ‘जुडवा २’ला मिळालेल्या या यशाचीच चर्चा होत आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धी तंत्राचाही यात मोलाचा हातभार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच ‘जुडवा २’च्या संपूर्ण टीमला ही खास भेट मिळालेय. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने आतापर्यंत २०३.३३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या खूप आनंदी आहे.