२०१२ साली अलिया भट्ट आणखी एक ‘स्टार’ कुटुंबातून पुढे आलेली मुलगी म्हणून ‘स्टुडंट ऑफ द इअर’मधून तिच्याकडे पाहिलं गेलं. पहिल्याच चित्रपटात बॉलीवूडसाठी ती उमदा कलाकार होती हे तिने सिद्ध केलं होतं. मात्र तरीही तिची, तिच्या बुद्धिमत्तेची यथेच्छ खिल्ली उडवली गेली. समाजमाध्यमांवर ती चेष्टेचा विषय ठरली. पण या सगळ्याकडे कानाडोळा करत अलियाने चित्रपटसृष्टीत ज्या पद्धतीचं काम तिला करायचं होतं ते करत राहिली. आज पाचव्या वर्षांत तिचा नववा चित्रपट प्रदर्शनसाठी तयार आहे. नऊपैकी फक्त एक चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आपटला आहे, मात्र बाकीचे चित्रपट सुपरहिट असल्याने सध्या आघाडीची नायिका एवढीच तिची गणना होत नाही आहे. तर शाहरुख खानबरोबर ‘डिअर जिंदगी’सारखा अनुभव देणारी अलिया झोयाच्या चित्रपटात कशी दिसेल? तिची आणि रणबीरची जोडी कशी असेल?, खुद्द अमिताभ बच्चन यांनाही तिच्याबरोबर काम करायचं आहे. इतकं उत्साहाचं, ग्लॅमरचं वलय तिच्याभोवती निर्माण झालं आहे. ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या फ्रँचाइझी चित्रपटाच्या निमित्ताने बोलताना अलियाचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं..

‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या तिच्या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वल म्हणून ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. दोन्ही चित्रपटांत ती दुल्हनिया आहे.. असं आपण म्हणायला जावं तर या चित्रपटात ती फक्त दुल्हनिया नाही, असं अलिया आग्रहाने सांगते. आधीच्या चित्रपटात माझी जी व्यक्तिरेखा होती काव्याची.. ती दुल्हनियाच होती. तिला त्या चित्रपटात हम्प्टीशी फक्त लग्न करायचं होतं. ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ची नायिका खूप वेगळी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती सुशिक्षित आहे. ती हवाईसुंदरी म्हणून काम करते आहे. त्यामुळे ती आपल्या करिअरच्या बाबतीत महत्त्वाकांक्षी आहे. लग्न हा तिचा उद्देश नाही. तिला जग फिरायचं आहे, नवं काही शोधायचं आहे-शिकायचं आहे. आपल्या करिअरमध्ये सर्वोत्तम व्हायचं आहे आणि मग आपल्याला समजून घेऊ शकेल, अशा मुलाशी तिला लग्न करायचं आहे. त्यामुळे या चित्रपटात आजच्या तरुणीची मानसिकता पाहायला मिळेल, असे तिने सांगितले.

‘दुल्हनिया’चा विषय निघाल्यानंतर आपसूकच अलियाला स्वत:ला तिचा जोडीदार कसा असावा असं वाटतं?, हा प्रश्न येणं साहजिक आहे. मात्र त्यावर मला जोडीदार कसा हवा?, असा पठडीतला प्रश्न विचारू नका म्हणून सांगत ती क्लीन बोल्ड करते. जोडीदार कसा हवा यापेक्षाही त्याच्याबरोबरचं माझं नातं कसं हवं?, याचा विचार जास्त महत्त्वाचा वाटतो असं ती म्हणते. माझ्या व्यवसायात वेळेचं गणित नाही. एकमेकांना वेळ देणं, एकमेकांना समजून घेणं या गोष्टी अभिनेत्री म्हणून काम करताना खूप गरजेच्या असतात. त्यामुळे माझ्या जोडीदाराबरोबर ते समंजसपणाचं नातं असलं पाहिजे. माझी महत्त्वाकांक्षा जाणून घेऊन वाटचाल करणारा जोडीदार हवा, कारण लग्नानंतरही माझी करिअर थांबणार नाही आहे, असं ती स्पष्ट करते. चित्रपटांच्या निवडीमागेही तिचा स्वत:चा असा वेगळा विचार आहे. माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीत माझी चित्रपटांची निवड महत्त्वाची ठरली आहे, याची मला कल्पना आहे. मी नेहमी चित्रपटाची कथा काय आहे ते पाहते. दिग्दर्शक कोण आहे, बॅनर-सहकलाकार या सगळ्या गोष्टी नंतर येतात. उलट नवीन दिग्दर्शक असेल तर मला त्यांच्याबरोबर काम करायला आणखी मजा येते, असं ती म्हणते.

सध्या अलिया कोणत्या दिग्दर्शकाबरोबर काम करते आहे, तिचा नायक कोण आहे, या सगळ्याबद्दल कमालीची उत्सुकता असते. याची आपल्याला कल्पना आहे, असं ती सांगते. एकदा यश मिळाल्यानंतर मीही माझ्या आवडत्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला उत्सुक आहे. मला झोयाबरोबर काम करायची इच्छा होती. ती आता पूर्ण होते आहे. भन्साळींसोबत काम करायचं आहे. पण यातही एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवते. माझ्या आवडत्या दिग्दर्शकाच्या चित्रपटातही काम करायचं असलं तरी त्यात मला खरोखरच काही व्यक्तिरेखा आहे की नाही हे मी पहिल्यांदा बघेन. त्यात मला चांगली भूमिका नसेल तर मी त्यांना नम्रपणे सांगेन की मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे, पण ते या चित्रपटात नाही. मी चांगल्या चित्रपटासाठी वाट पाहीन, असं ती ठामपणे सांगते तेव्हा तिच्या यशाचं गमक आपल्या लक्षात येतं. माझ्या अनुभवावरून सांगते, मी अमुक एका अभिनेत्यासोबत काम करायचं आहे अशा विचाराने जेव्हा चित्रपट करते तेव्हा तुम्हाला भूमिकेशी देणंघेणं नाही आहे, हे तुमच्या कामातूनही जाणवतं. ती मोठी चूक असते. तुम्हाला तुमची भूमिका आवडली असेल तरच तुम्ही काम केलं पाहिजे. तिथे डोक्याने नव्हे तर मनापासून काम करण्याची गरज असते, असं तिने सांगितलं. यासाठी तिने ‘शानदार’चं उदाहरणही दिलं. मला खरंच माझी व्यक्तिरेखा आवडली होती म्हणून मी तो चित्रपट स्वीकारला होता. तो चालला नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण म्हणून माझी निवड चुकली नव्हती, असंही तिने स्पष्ट केलं.

हिंदी चित्रपटसृष्टीत आता नायिकाप्रधान चित्रपटांची लाट आली आहे आणि तरीही अभिनेत्रींना अजूनही अभिनेत्यांच्या तुलनेत कमी मानधन दिलं जातं, याबद्दलही तिची मतं वेगळी आहेत. एक म्हणजे नायिकाप्रधान चित्रपट तेव्हाही होते. माझ्या वडिलांनी ‘अर्थ’सारखा चित्रपट के ला. आणि त्या काळी शबाना आझमी यांनी एकटीने तो चित्रपट आपल्या खांद्यावर पेलला होता. आता अशा चित्रपटांबद्दल बोललं जातं आहे त्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं जातं असं ती म्हणते. स्त्रियांना जगभारत कुठेही गेलात तरी आदरानेच वागवलं गेलं पाहिजे, यावर आपलं ठाम मत असल्याचं ती सांगते. पण कामाच्या बाबतीत बोलायचं तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा.. तुमचं बाजारमूल्य काय आहे, यावरून तुम्हाला तुमचं मानधन दिलं गेलं पाहिजे, असं ती म्हणते. ‘नीरजा’चंच उदाहरण आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी भरपूर पैसा ओतला होता. आणि सोनमच्या अभिनयामुळे प्रेक्षकांनी चित्रपट पाहायला गर्दी केली. आपल्या नावावर चित्रपटाला गर्दी होऊ शकते हे तिने सिद्ध केलं आहे. त्यामुळे ती यशस्वी अभिनेत्री आहे. निर्माते हाच विचार करतात आणि त्यात आपल्याला काही वावगं वाटत नसल्याचं तिने सांगितलं. वरुणबरोबरचा हा तिचा तिसरा चित्रपट आहे. पण पहिल्या चित्रपटापासूनच आम्ही दोघंही एकमेकांना सांभाळून काम करतो असं तिने सांगितलं. वरुणचा अभिनय म्हणजे तो अभ्यासपूर्ण तयारी करून काम करतो. माझं तसं नाही. मला आतून जे वाटतं, लेखकाने काय लिहिलं आहे. त्याला त्यातून काय अपेक्षित आहे हे समजून घेतल्यानंतर मी त्या पद्धतीने अभिनय करते, साहजिकपणे मनात येतं ते करते आणि तेच लोकांना आवडतं, असा आपला अनुभव असल्याचं तिने सांगितलं. सध्या ‘रण’बीर आणि वीर दोन्हींवर आपण निशाणा साधला असून दोघांबरोबर काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं तिने सांगितलं. याशिवाय, अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही ती लवकरच पडद्यावर दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र त्याबद्दल फारसं काही उलगडू न देता तसं झालं तर खूप आनंद होईल, असं ती म्हणते. रणबीरसोबत काम करताना एक दडपण आहे असं ती म्हणते. कारण रणबीर सेटवर पूर्ण वेगळा असतो. इम्तियाजने तर त्याला ‘सैनिक’, सेटवरचा सैनिक असं नाव देऊन टाकलं आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं एक आव्हान असेल, असं तिला वाटतं.