नवरात्रोस्तवाची सुरुवात झाली त्याच दिवशी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटातील दीपिका पदुकोणचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला. या लूकमध्ये महाराणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिकाने अनेकांचच लक्ष वेधलं. दागिने, वेशभूषा आणि जोडलेल्या भुवया यामुळे दीपिकाचा हा लूक ट्रेंडमध्येही आला. इतिहासातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाशझोत टाकला जाणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग, शाहिद कपूर यांच्याही मुख्य भूमिका असणार आहे.

दीपिका मागोमाग ‘पद्मावती’मधील शाहिदच्या लूकवरुनही पडदा उचलण्यात आला. भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाविषयीची प्रत्येक गोष्ट सध्या उत्सुकता जागवत असतानाच अभिनेत्री अनुष्का शर्माच्या वक्तव्याने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणी पद्मावतीच्या भूमिकेत झळकणाऱ्या दीपिकाची सर्वच स्तरांतून प्रशंसा होत असताना अनुष्काने मात्र प्रवाहाच्या विरुद्ध जात पद्मावतीच्या लूकविषयीचा प्रश्न विचारताच मोठ्या चतुराईने विषय बदलण्याचा प्रयत्न केला.

‘पिंकव्हिला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एका कार्यक्रमात अनुष्काला दीपिकाच्या लूकविषयी विचारलं असता ती म्हणाली, ‘मी ज्या ठिकाणी चित्रीकरण करत होते तिथे मोबाईलला नेटवर्कच नव्हतं. पण, या गोष्टीचा (पोस्टर प्रदर्शित झाल्याचा) मला फार आनंद होतोय. नेटवर्क अभावी माझ्यापर्यंत कोणाचाही मेसेज, फोन पोहोचला नाही. त्यामुळे जगात कुठे काय चाललं आहे याबदद्ल मला काहीच समजत नव्हत’, अनुष्का नेमकं हे काय बोलतेय असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. पण, याविषयी कोणी तर्क लावण्याआधीच तिने यासंबंधीचं उत्तर देत काही गोष्टी स्पष्ट केल्या.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण…

तिने आपली प्रतिक्रिया देत पुढे याची उकल केली, ‘हो अशी जागा आहे आणि मी त्याच ठिकाणी गेले होते. तुमचा विश्वास बसणार नाही पण, ती जागा मुंबईतच आहे.’ दीपिकाच्या लूकविषयी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना विषय बदलत तिने केलेली ही चतुराई अनेकांच्या लक्षात आली. ‘आपण मुंबईत नेटवर्क नसलेल्या ठिकाणी असल्यामुळे त्या दिवशी कोणती गोष्ट प्रदर्शित झाली याचा मला काहीच अंदाज नव्हता. कारण मी ते काहीच पाहिलं नाही. माझ्यामते आता मला ज्ञानात भर पाडण्याची गरज आहे. जेणेकरुन पुढच्या वेळी आपण भेटू तेव्हा आपण या विषयावर चर्चा करु शकू. तुर्तास मी नेटवर्क नसलेल्या भागामध्ये चित्रीकरण करत असल्यामुळे मला ही माहिती मिळाली नाही’, असं ती माध्यमांना उद्देशून म्हणाली. अनुष्काचं हे लांबलचक उत्तर ऐकून तिला नेमकं म्हणायचं काय होतं, याच प्रश्नाने अनेकांच्या मनात घर केलं. अनुष्काने त्याच दिवशी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटोही पोस्ट केला होता. हा फोटो पाहून खरंच त्या ठिकाणी नेटवर्क नव्हतं का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.