सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या काही अभिनेत्रींपैकीच एक म्हणजे आएशा टाकिया. समाजवादी पक्षातील अबू आझमी यांच्या मुलासोबत म्हणजेच फरहान आझमीसोबत आएशाने बऱ्याच वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. तेव्हापासूनच ती चित्रपटांपासून दुरावली गेली. पण, लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर आता तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हिंदू मुलीसोबत लग्न केल्याप्रकरणी फरहान आजमीला ही धमकी देण्यात आली. फोनवरुन फरहानला ही धमकी देण्यात आली.

फरहानने याप्रकरणी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे. त्याने पोलिसांकडे याप्रकरणीच्या तपासाची मागणीही केली आहे. त्यासोबतच धमकीच्या फोनचे रेकॉर्डिंगही त्याने पोलिसांना दिले आहेत. ‘हा फारच गंभीर विषय असून, त्यासंबंधी योग्य तो तपास होण्याची गरज आहे. कारण, आम्ही सर्वजण भीतीच्या छायेखाली आहोत’, असं फरहान म्हणाला. याविषयी अधिक माहिती देत फरहान म्हणाला, ‘फोन करणाऱ्या व्यक्तीने मला धमकावलं, की तू एका हिंदू मुलीशी लग्न केलं आहे. याचे परिणाम तुला भोगावे लागतील.’ हिंदू कट्टरपंथीय गटाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींनी ही धमकी दिल्याचा अंदाज फरहानने वर्तवला आहे.

ट्विटर अकाऊंटवरुन फरहानने यासंबंधीची माहिती पोस्ट करत त्यासोबतच तक्रारीच्या पत्रकाचेही फोटो पोस्ट केले आहेत. याप्रकरणी आता पोलीस तपास सुरु असून, सदर प्रकरणाची माहिती लवकरच उघड येईल असं म्हटलं जात आहे. फरहान गेल्या बऱ्याच वर्षांपासून रेस्तराँ व्यवसायात सक्रीय आहे. काही दिवसांपूर्वीच आएशाच्या साथीने त्याने एक ‘व्हेगन’ रेस्तराँ सुरु केलं होतं.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

https://www.instagram.com/p/BTgQgPyDuGm/