बॉलिवूडचं ‘मंकी कपल’ म्हणून ओळखलं जाणारी अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट समुद्रकिनारी पोहोचले आहेत. करण आणि बिपाशा गेल्या बऱ्याच दिवसांपासून कामात फारच व्यस्त होते. त्यामुळे त्यांना लग्नाचा वाढदिवस साजरा करता आला नव्हता. पण, आता मात्र या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत बी- टाऊनचं हे ‘मंकी कपल’ लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रेशन मूडमध्ये दिसत आहेत.

करण आणि बिपाशाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांनाही या आनंदात सहभागी करुन घेतलं आहे. पोस्ट केलेल्या या व्हिडिओंपैकीच एका व्हिडिओमध्ये करण बिपाशासाठी एक गाणं म्हणताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये या दोघांचीही धमाल-मस्ती पाहायला मिळतेय. ‘मंकी लव्ह’ असा हॅशटॅग देत हे सेलिब्रिटी कपल अनेकांसाठीच आदर्श कपल ठरत आहे. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये अनेकांच्याच नजरा असणाऱ्या सेलिब्रिटी कपल्सपैकी एक म्हणजे करण-बिपाशा.

‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर बॉलिवूडच्या या ‘डस्की ब्युटी’ची करणसोबत ओळख झाली होती. मैत्रीपासून सुरु झालेला हा प्रवास कधी प्रेमात रुपांतरित झाला हे या दोघांनाही कळलं नाही. करणच्या रुपात भेटलेल्या खास मित्राशीच लग्न झाल्याबद्दल बिपाशाने आनंद व्यक्त केला होता.