कलाकारांसोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकतेचं वातावरण असतं. त्यातही बॉलिवूड आणि एकंदर कलाविश्वाविषयीच्या वेडापोटी चाहते कधी काय करतील याचा काहीच नेम नसतो. खूप कमी चाहत्यांना त्यांच्या आवडत्या फिल्मस्टार्सना भेटण्याची संधी मिळते. ही संधी जेव्हा मिळते तेव्हा त्या संधीचं सोनं करत चाहतेसुद्धा कलाकारांसोबत एक सेल्फी काढतातच. असाच एक चाहता दीपिका पदुकोणला भेटला होता. त्याने दीपिकासोबत एक सेल्फी काढला खरा… पण, त्याच्या या सेल्फीने सारा घोळच केला.

गेल्या काही दिवसांपासून या चाहत्यासोबतचा दीपीकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल तो व्हिडिओ कोणता? खरंतर ही कोका कोलाची नवी जाहिरात आहे. बऱ्याच प्रॉडक्ट्सच्या जाहिरातींमध्ये झळकलेली दीपिका ‘कोका कोला’च्या आणखी एका नव्या संकल्पनेच्या जाहिरातीत झळकत आहे. दीपिकाने स्वत: तिच्या फेसबुक पेजवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रसारमाध्यमांच्या नजरेत असणारी दीपिका लिफ्टमध्ये गेल्यावर लिफ्ट बंद पडते आणि मग वेटरसोबत बी-टाऊनची ही मस्तानी तिथेच अडकते. मुख्य म्हणजे लिफ्ट बंद झाल्याच्या काही वेळानंतर जेव्हा दीपिकाचीही काहिली होते तेव्हा तो वेटर तिला ‘कोका कोला’ देतो.. आणि मग काय… कोका कोला, दीपिका आणि तो वेटर यांची जी काही धमाल घडी बसते त्याचे चित्रण या जाहिरातीत पाहायला मिळत आहे.

मुख्य म्हणजे लिफ्ट रिपेअर झाल्यानंतर तो वेटर दीपिकासोबत एक सेल्फी काढतो खरा… पण, या सेल्फीमध्ये दीपिकाचा चेहराच दिसत नाही, त्यामुळे एका अर्थी त्या वेटरचा हिरमोड होतो. पण, लाखो चाहत्यांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या दीपिकासोबत काही मजेशीर क्षण व्यतीत केल्याचा आनंदही त्या वेटरच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. या जाहिरातीची एकंदर संकल्पना आणि चाहत्यांशी दीपिकाचे असणारे नाते यांमुळे सोशल मीडियावरही सध्या ही जाहिरात व्हायरल होत आहे.

ट्रेंडमध्ये असणाऱ्या या जाहिरातीबद्दल दीपिकावर टीकाही करण्यात येत आहे. ‘कोका कोला’ या शीतपेयाला घातक म्हणत काहीजणांनी या पेयाच्या जाहिरातीत दीपिकाने काम केल्यामुळे नाराजीचा सूर आळवला आहे.