अभिनय, फॅशन आणि कलाविश्व असं आहे जिथे बऱ्याच कलाकारांना काही बाबतीत इतरांचा रोष सहन करावा लागतो. अशाच कलाकरांच्या यादीत आता अभिनेत्री कल्की कोचलीनच्या नावाचाही समावेश झाला आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या न्यूड फोटोविषयी कल्कीने आता तिचं मत मांडलं आहे. हे मत मांडताना मी जे काही करते त्याबद्दल मला काहीच लाज वाटत नाही, असंही ती म्हणाली.

‘मिड- डे’ला दिलेल्या मुलाखतीत कल्की म्हणाली, ‘आपण एक महिला असल्यामुळे नेहमीच आपल्याकडे पुरुषांच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. पण, माझा तो फोटो एका महिला फोटोग्राफरनेच काढला होता. त्यामुळेच मला तो सोशल मीडियावर शेअर करणं फार महत्त्वाचं वाटलं.’ कल्कीने काही दिवसांपूर्वी हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या कृष्णधवल फोटोमध्ये कल्की पाठमोरी बसलेली दिसते. तिच्या या फोटोचं कॅप्शनही काहीसं लक्षवेधी ठरलं. पण, नेटिझन्सनी मात्र या फोटोशूटमुळे तिच्यावर टीकेचा भडीमार केल्याचं पाहायला मिळालं होतं.

वाचा : … आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं

काही यूजर्सनी तर कल्कीला स्वत:ची अॅडल्ट वेबसाइट सुरु करण्याचा सल्लाही दिला. तर एका युजरने तिला न्यूडीटीमध्येही काही मर्यादा राखा. भारतीय संस्कृतीची अशा प्रकारे विल्हेवाट लावू नका, असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. कल्कीच्या या फोटोची चर्चा होण्यापूर्वी अभिनेत्री इशा गुप्ताचं फोटोशूटही बरंच चर्चेत आलं होत. या फोटोशूटमध्येही इशाच्या बोल्ड अदा पाहायला मिळाल्या होत्या. अभिनेत्रींचे बोल्ड फोटोशूट आणि त्यावर नंतर नेटिझनचा होणारा विरोध पाहता गेल्या काही दिवसांपासून हे असे प्रकार वाढत असल्याचं लक्षात आलं आहे. बऱ्याच मर्यादा ओलांडत अभिनेत्री मोठ्या धाडसानं अशा प्रकारचं फोटोशूट करण्याचं पाऊल उचलत असून, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला गेला पाहिजे ही बाब प्रकर्षाने जाणवू लागली आहे.