‘स्त्री’ म्हणजे निसर्गाने घडवलेली एक अशी गोष्ट आहे, जिच्याविषयी सांगावे, बोलावे, लिहावे तितके कमीच. स्त्रियांविषयीच्या बऱ्याच गोष्टींवर खुलेपणाने चर्चा केली जात नव्हती. पण, आज मात्र परिस्थिती बदलली आहे. महिलांशी संबंधित बऱ्याच विषयांवर आज खुलेपणाने बोलण्याला प्राधान्य दिले जात आहे. याच विषयांमधील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मासिक पाळी. महिलांच्या आयुष्यात मासिक पाळीविषयी बऱ्याच समजुती आहेत. मुळात या समजुती प्रत्येकाच्या विचारसरणीनुसार बदलतात.

मासिक पाळी म्हटल्यावर त्याविषयी असणारे न्यूनगंड, गैरसमजुती, इतरांच्या मनात या एका गोष्टीमुळे महिलांसाठी असणारी सहानुभूती या साऱ्या गोष्टींबद्दल अभिनेत्री कल्की कोचलीनने खुलेपणाने तिचे मत मांडले आहे. कल्की नेहमीच महत्त्वाच्या विषयांवर तिचे मत मांडते. त्यातही तिने मासिक पाळीविषयी स्पष्ट केलेली तिची भूमिका आणि सरकारच्या वस्तू व सेवा अर्थात ‘जीएसटी’ करप्रणालीवर केलेली टीका सध्या अनेकांचे लक्ष वेधत आहे.

‘बॉलिवूड बबल’ या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने मासिक पाळीविषयी असणाऱ्या गैरसमजुतींविषयीही थेट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. अवघ्या २ मिनिटे १८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सर्व मुद्दे अगदी स्पष्ट आणि प्रभावीपण मांडण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे या व्हिडिओला नावही मोठ्या कल्पकतेने देण्यात आले आहे. भाजप सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवर लागू केलेल्या अवाजवी जीएसटीच्या मुद्द्याला अधोरेखित करत या व्हिडिओला ‘गर्ल्स को सताओ टॅक्स (जीएसटी)’ असे नाव देण्यात आले आहे.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

व्हिडिओच्या सुरुवातीलाच मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वभावामध्ये होणाऱ्या बदलांमुळे महिलांना जे सल्ले दिले जातात त्याची सुरेख जोड देण्यात आली आहे. त्यामागोमागच या सल्ल्यांना कंटाळलेली कल्की शेवटी, ‘ते’ पाच दिवस आमच्यासाठी ‘अच्छे दिन’ नसतात हे सांगत आपले मत मांडते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ बराच चर्चेत आला असून, पुन्हा एकदा सॅनिटरी नॅपकिन्सवर लावण्यात आलेल्या जीएसटी करप्रणालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.