चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कल्की कोचलीन गेल्या बऱ्याच दिवसांपासून सिंगल होती. पण, आता मात्र ती सिंगलवरुन मिंगल होण्यास तयार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खोडकर वृत्तीची ही अभिनेत्री पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘नीरजा’ या चित्रपटाच खलनायकी भूमिकेत दिसलेल्या अभिनेता जिम सार्भसोबत ती लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.

जिम आणि कल्की एकमेकांचे खूप चांगले मित्र असल्याचं अनेकांनाच ठाऊक होतं. पण, त्यांच्या लग्नाच्या बातमीने अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जिम- कल्कीने कधीही त्यांच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाहीये. पण, तरीही अनेकांनीच कल्कीसाठी आनंद व्यक्त केला आहे. कल्की आणि जिमच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचं झालं तर, या दोघांचीही नावं कोणाशी फारशी जोडली गेली नव्हती. आपल्या अभिनयाच्या बळावर या दोघांनीही चित्रपटसृष्टीत स्थान मिळवलं आहे.

https://www.instagram.com/p/9V62ACGlxV/

वाचा : ‘त्या’ न्यूड फोटोविषयी कल्की म्हणते…

दरम्यान, जिमसोबत लग्न करण्याच्या चर्चा खऱ्या असल्या तर कल्कीचा हा दुसरा विवाह असून, याआधी तिने चित्रपट निर्माता- दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्नगाठ बांधली होती. अनुराग आणि कल्कीच्या नात्याची चित्रपट वर्तुळातही बरीच चर्चा झाली होती. मोठ्या थाटामाटात या दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता. पण, त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या नात्याला तडा गेला. काही दिवसांपूर्वीच अनुरागही शुभ्रा शेट्टी नावाच्या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सर्वांसमोर उघड झालं होतं.