बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झाशीच्या राणीची जीवनगाथा असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं असून एका दृश्याच्या चित्रीकरणावेळी कंगनाला दुखापत झाली आहे. तलवारबाजीच्या दृश्याचं चित्रीकरण करतेवेळी कंगना जखमी झाली असून तिच्या डोक्यावर दोन भुवयांच्या मध्यभागी जखम झाली आहे.

सहअभिनेता निहार पंड्यासोबत कंगना या दृश्याचं चित्रीकरण करत होती. निहार तलवारीचा वार करणार तेव्हाच कंगनाला खाली झुकायचं होतं. पण, तेव्हा काहीसा गोंधळ झाल्यामुळे कंगनाला ही दुखापत झाली असल्याचं म्हटलं जात आहे. या जखमेमुळे पंधरा टाके घातल्याचंही म्हटलं आहे. हैद्राबादमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून कंगनाला नजीकच्या अपोलो रुग्णालयात दाखल केलं आहे. तिची जखम पाहता काही दिवसांनंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे.

‘मिड डे’ला दिलेल्या माहितीत या चित्रपटाचे निर्माते म्हणाले, ‘या घटनेमध्ये कंगनाच्या भुवयांमध्येच एक जखम झाली आहे. तिची जखम आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना पाहता कंगना मोठ्या धीराने या प्रसंगाला सामोरी गेली. यामध्ये अभिनेता निहार पंड्याने तिची माफी मिगितली असून तोसुद्धा घाबरला होता. पण, कंगनाने हे काही फारसं मनावर घेतलं नाही.’

वाचा : …म्हणून कटप्पाच्या मुलीने लिहिलं मोदींना पत्रं

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटासाठी कंगनाने डमी वापरण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात ती बरीच साहसदृश्ये साकारताना दिसणार आहे. इतकच नव्हे तर कपाळावर असलेल्या जखमेचा व्रण पाहता तो लगेचच निवळेल असं दिसत नाही. पण, कंगनाने मात्र त्या जखमेसह चित्रपटाचं चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. झाशीची राणी ही एक योद्धा होती त्यामुळेच कंगनाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.