बी- टाऊनची बेगम करिना कपूर खान आणि नवाब सैफ अली खान यांचा मुलगा तैमुरसुद्धा आई-बाबांप्रमाणेच सेलिब्रिटी असल्यासारखं वावरु लागला आहे. तैमुरच्या जन्मापासूनच त्याच्याविषयी प्रत्येकाच्या मनात असणारं कुतूहल पाहायला मिळत आहे. त्यातही अधूनमधून व्हायरल होणारे त्याचे निरागस फोटो या कुतूहलपूर्ण चर्चांना आणखीनच हवा देत आहेत.

सध्यासुद्धा ‘सैफिना’चा हा छोटा नवाब त्याच्या अशाच एका फोटोमुळे चर्चेत आला आहे. करिश्मा कपूरच्या घराबाहेरील तैमुरचा फोटो सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहे. जन्मानंतर काही दिवस प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवलेल्या तैमुरची झलक टिपण्यात आता छायाचित्रकारही यशस्वी झाले आहेत. चर्चेत असणाऱ्या या फोटोमध्ये तैमुर अतिशय निरागस दिसत असून, त्याच्या आयाने त्याला उचलून घेतल्याचं पाहायला मिळतंय. तैमुरला अद्यापही करिनाने कोणत्याच मोठ्या कार्यक्रमात आपल्यासोबत नेलं नसून, सध्यातरी ती त्याला माध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतेय.

https://www.instagram.com/p/BUpLfoFD2Xb/

छोट्या नवाबच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीतील कामातून वेळ काढून मुलाच्या संगोपनावर लक्ष देणारी करिना पुन्हा एकदा तिच्या कामाकडे लक्ष देऊ लागली आहे. चित्रपटांकडे बेबोने पुन्हा तिचा मोर्चा वळवला असून ती योगसाधनाही करत असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, सैफ आणि करिना दोघंही तैमुरच्या संगोपनावर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे सध्या या सेलिब्रिटी ‘मॉम- डॅड’चीच चर्चा होतेय. त्यातही त्यांच्या गोंडस मुलाचे फोटो पाहता करिना तैमुरचा उल्लेख करताना ‘माझा मुलगाच सर्वात सुंदर’ असं का म्हणते हेही लक्षात येतंय.

वाचा: ‘तिने माझी काहीच किंमत ठेवली नव्हती’