कोणा एका मोठ्या किंवा मग प्रसिद्ध चेहऱ्याची भेट घेतल्यावर बरेचजण हा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतात. अभिनेत्री मल्लिका शेरावतनेही असाच आनंद व्यक्त केला. तिने नुकतीच भेट घेतलेली व्यक्तीही तशी खासच आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये त्या व्यक्तीला भेटण्याचा आनंद व्यक्त केला. ती व्यक्ती म्हणजे इवाना ट्रम्प.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नीची भेट घेतल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयीही मल्लिकाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. इवाना चेक रिपब्लिकमधील एक प्रतिष्ठीत व्यावसायिका असून, याआधी त्या मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत इवाना यांचं नातं १९७७ ते १९९२ पर्यंत टिकलं. पण, त्यानंतर नात्याला तडा गेला आणि या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या.

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

सध्याच्या घडीला इवाना यांच्या नावाची फारशी चर्चा नसली तरीही डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी आयुष्याचा विषय निघाला की त्यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख होतोच. राहता राहिला विषय मल्लिकाचा तर सध्या बॉलिवूडमध्ये ती फार कमी दिसते. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर्टी पॉलिटीक्स’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण, त्यानंतर मात्र ती प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. चित्रपट आणि कलाविश्वापासून मल्लिका सध्या दूर असली तरीही सोशल मीडियावर मात्र ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. विविध ठिकाणांना भेट देत किंवा मग आपल्या रोजच्या जीवनातील काही महत्त्वाच्या क्षणांचे फोटो पोस्ट करत मल्लिकाने चाहत्यांसोबतचं नातं जपलं आहे.